नालेसफाईस सुरुवात होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेत्यांचा पाहणी दौऱ्याचा स्टंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:15+5:302021-05-08T04:42:15+5:30
ठाणे : शहरातील नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा गुरुवारी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला होता. त्यानंतर १० दिवसांत ...
ठाणे : शहरातील नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा गुरुवारी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला होता. त्यानंतर १० दिवसांत नालेसफाई पूर्ण न केल्यास महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला होता; परंतु नालेसफाईची प्रत्यक्ष स्वरूपात कामे सुरू होण्यापूर्वीच त्यांनी केवळ फोटोसाठी स्टंटबाजी केल्याची बाब उघड झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मेच्या पहिल्या आठवड्यापासून नालेसफाईस सुरुवात होऊन जूनच्या पहिल्या आडवाड्यात ती कामे जवळजवळ पूर्ण होतात; परंतु गुरुवारी विरोधी पक्षनेते पठाण यांनी शहरातील प्रमुख आठ नाल्यांचा पाहणी दौरा केला होता. यात शहरातील केवळ १० टक्केच नालेसफाई झाली असल्याचा दावाही करून त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावरदेखील घेतले होते; परंतु आता धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने नालेसफाईची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून गुरुवारी या कामाच्या वर्कऑर्डर देण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यानुसार शुक्रवारपासून प्रत्यक्ष स्वरूपात नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार झाली. यामुळे नालेसफाई सुरू होण्यापूर्वीच तिचा पाहणी दौरा करणाऱ्या पठाण यांचे सर्वत्र हसे होत असून केवळ फोटोसाठीच ही स्टंटबाजी केली होती का, अशी टीकाही होऊ लागली आहे.