मासळी बाजाराबाहेर गाळ्यास केला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:04 AM2019-06-08T00:04:05+5:302019-06-08T00:04:12+5:30
भाईंदर पालिकेचा निषेध : आमची फसवणूक केल्याचा महिला विक्रेत्यांचा आरोप
मीरा रोड : भाईंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती क्र. १ च्या इमारतीत तळ मजल्यावर असलेल्या मासळी बाजारात तसेच प्रवेशद्वाराभोवती गाळे काढण्याच्या पालिकेच्या प्रयत्नास मासेविक्रेत्या महिलांनी विरोध केला आहे. महापालिकेची जागा नसताना आमची फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षनेते राजू भोईर यांची भेट घेऊन गाºहाणे मांडले. तर, मासळी बाजाराबाहेर गाळे बांधून रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित सात गाळेधारकांना स्थलांतरित करणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
भाईंदर पोलीस ठाण्याजवळील मासळी बाजार हा पूर्वापार चालत आलेला आहे. आधी तो मोकळ्या जागेत भरत असे. परंतु, पालिकेने महिलाविक्रेत्यांना मासळी बाजार बांधून देण्याचे आश्वासन देऊन चक्क इमारतच उभी केली. त्यामध्ये तळ मजल्यावर मासळी बाजार व गाळे तर वर आरोग्य केंद्र, प्रभाग कार्यालय आदी चालवले जात आहे. मुळात ही जागा पालिकेची नसताना त्यावेळी पालिका कार्यालयासाठी विक्रेत्यांची फसवणूक करून बाजाराची मोकळी जागा पालिकेने बळकावल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. त्यातच मासळी बाजारासमोर असलेल्या सुमारे सहा ते सात छोट्या टपऱ्या हटवून रस्ता रुंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. वास्तविक, हा रस्ता विकास आराखड्यातीलच नाही. परंतु, रस्ता रुंद केल्यास नाझरेथ शाळेत जाणारे विद्यार्थी यांची गर्दी टळेल, तसेच मागील बाजूला असलेल्या शास्त्रीनगरमध्ये मोठी वाहने जाऊ शकणार आहेत. त्यासाठी पालिकेने येथील टपºया हटवून त्यांना थेट मासळी मार्केटमध्ये आणि प्रवेशद्वाराबाहेर पक्के गाळे बांधून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. बाजाराच्या प्रवेशद्वाराभोवती गाळ्यांचे बांधकाम सुरू केले आहे.
सुमारे ४५ विक्रेत्या वर्षानुवर्षे मासळी विक्री करत आहेत. त्यातच पालिकेने मनमानीपणे मासळी बाजारात आणि प्रवेशद्वारावर गाळे बांधकाम सुरू केल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर, पालिकाच मनमानी आणि बेकायदा बांधकामे करत असल्याबद्दल रहिवाशांनी टीका केली आहे. याविरोधात गुरुवारी विक्रेत्या पालिकेत येऊन गाळे बांधकामास विरोध केला. विरोधी पक्षनेते राजू भोईर यांना भेटून त्यांनी निवेदन दिले. भोईर यांनीही तातडीने आयुक्त आणि प्रशासनाकडे स्थलांतरित गाळेधारकांना आजूबाजूला जागा द्या, पण कोळिणींवर अन्याय करू नका, अशी मागणी केली आहे.
मासळी बाजारात गाळे बांधणार नाही. प्रवेशद्वाराबाहेर गाळे बांधून टपरीधारकांना त्यात स्थलांतरित करून रस्ता रुंद करणार आहोत. शाळा आणि शास्त्रीनगरवासीयांच्या सोयीसाठी रुंदीकरण करतोय. - दीपक खांबित, कार्यकारी अभियंता
गरिबांवरच दादागिरी आणि मनमानी केली जाते. मूळची जागा मासळी बाजाराची. त्यावर पालिकेने जमीन त्यांची नसताना इमारत बांधली. त्याचीही तक्रार नाही. गाळेधारकांना जागा द्या, पण ती मासळी बाजाराच्या आवारात कशाला? आमचा विरोध राहील. नाइलाज झाल्यास आंदोलन करू. - ज्योत्स्ना दंड्रे, मासेविक्रेती