पप्पू कलानीच्या मुदतपूर्व सुटकेस विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:34 AM2019-04-12T06:34:11+5:302019-04-12T06:34:23+5:30
इंदर भटिजा हत्या प्रकरणात माजी आमदार पप्पू कलानी येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
- सदानंद नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानीची मुदतपूर्व सुटका करणे योग्य नाही, असा अहवाल विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याने येरवडा कारागृहासह उल्हासनगरच्या सहायक पोलीस उपायुक्तांना पाठवला आहे. त्यामुळे त्याच्या मुदतपूर्व सुटकेची शक्यता मावळली आहे.
इंदर भटिजा हत्या प्रकरणात माजी आमदार पप्पू कलानी येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने मुदतपूर्व सुटका मिळण्यासाठी येरवडा कारागृहाकडे अर्ज केला होता. त्यानुसार, याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचा अभिप्राय मागवण्यात आला होता. विठ्ठलवाडी पोलिसांनी याबाबत काय अहवाल दिला, याची माहिती या गुन्ह्यातील तक्रारदार व फिर्यादी कमल भटिजा यांनी मागितली होती. त्यानुसार, विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भोमे यांनी ८ एप्रिल रोजी येरवडा कारागृहासह उल्हासनगरच्या सहायक पोलीस आयुक्तांना दिलेल्या अहवालाची एक प्रत भटिजा यांना दिली. या अहवालात पप्पू कलानी याच्यावर एकूण ६५ गुन्हे दाखल असून, त्यापैकी १३ प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे म्हटले आहे. कलानीची मुदतपूर्व सुटका केल्यास तक्रारदाराच्या जीवितास, तसेच १३ न्यायप्रविष्ट प्रकरणांमधील साक्षीदारांना धमकावून त्यांना फितूर करण्याचा धोका पोलिसांनी वर्तवला आहे.
तसेच विठ्ठलवाडी पोलिसांनी विविध कारणे देत, पप्पू कलानीची कोणत्याही अटी व शर्तीवर मुदतपूर्व सुटका करू नये, असे स्पष्ट मत या अहवालाद्वारे नोंदवले आहे. हा अहवाल कमल भटिजा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर खळबळ उडाली आहे.
पॅरोलवर झालेली सुटका
महापालिका निवडणुकीपूर्वी पप्पू कलानीची पॅरोलवर सुटका केली होती. वय व चांगले वर्तन लक्षात घेता, कलानी याची मुदतपूर्वी सुटका होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यानंतर, कलानी यानेही तसा अर्ज येरवडा कारागृह अधीक्षकांकडे केला होता; मात्र विठ्ठलवाडी पोलिसांच्या अहवालामुळे त्याच्या सुटकेची शक्यता मावळली आहे.