वादग्रस्त उपायुक्तास पुन्हा पालिका सेवेत घेण्यास विरोध; शिवसेना प्रणित कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 01:07 PM2021-04-02T13:07:09+5:302021-04-02T13:07:22+5:30
मीरा भाईंदर महापालिकेत कार्यरत असताना म्हसाळ विरोधात भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराचे आरोप झाल्याने ते वादग्रस्त राहिले .
मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेत २०१५ ते २०१८ ह्या काळात ३ वर्षां पेक्षा जास्त काळ उपायुक्त पदी राहिलेल्या विजयकुमार म्हसाळ यांना शासनाने पुन्हा मीरा भाईंदर महापालिकेत उपायुक्त पदी नेमल्याने शिवसेना प्रणित कामगार सेनेने ह्या नियुक्तीला जोरदार विरोध केला आहे . म्हसाळ हे वादग्रस्त आणि अनेक आरोप असलेले अधिकारी असल्याने त्यांना हटवले नाही तर आंदोलनाचा इशारा कामगार सेनेने दिला आहे.
कामगार सेनेचे सरचिटणीस शयाम म्हाप्रळकर यांनी म्हसाळ यांच्या नियुक्ती विरोधात तक्रार करतानाच गंभीर आरोप केले आहेत . म्हसाळ हे २०१५ ते २०१८ ह्या कालावधीत मीरा भाईंदर महापालिकेत उपायुक्त मुख्यालय म्हणून प्रतिनियुक्तीवर होते . त्या नंतर त्यांची बदली ठाणे महापालिकेत झाली . आणि ठाणे महापालिकेतून पुन्हा त्यांना मीरा भाईंदर महापालिकेत उपायुक्त म्हणून नेमण्यात आले आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत कार्यरत असताना म्हसाळ विरोधात भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराचे आरोप झाल्याने ते वादग्रस्त राहिले . त्यांच्या विरुद्धच्या तक्रारी प्रलंबित आहेत . कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात नाराजी होती . कामगार सेनेच्या तक्रारीवरून तत्कालीन अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांची चौकशी करून अहवाल १८ जानेवारी २०१९ रोजी आयुक्तांना सादर केला होता. तो अहवाल अजून कार्यवाहीच्या प्रतीक्षेत आहे .
बऱ्याच जणांना त्यांनी नियमबाह्य पदोन्नती देण्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तसेच त्यांच्याच काळात पालिकेच्या मालकीचे वाहन चोरीला गेले व त्याची सुद्धा त्यांनी पोलिसात तक्रार केलेली नाही, कर्मचाऱ्यांची रजा शिल्लक नसताना त्यांना सहा सहा महिन्यांचा पगार देऊन भ्रष्टाचार केलेला आहे. महानगरपालिका सेवा शर्ती नियमानुसार पालिकेत उपायुक्त पदाची चार पदे मंजूर आहेत. त्यातील दोन पदे प्रतिनियुक्तीने भरायची असून ती शासनाने उपायुक्त म्हणून संभाजी वाघमारे व अजित मुठे यांना नेमून भरलेली आहेत .
पालिकेतून भरायच्या २ उपायुक्त पदां पैकी एक पद डॉ. संभाजी पानपट्टे यांचे असून दुसरे उपायुक्त पद हे पालिकेतीलच अधिकाऱ्याच्या पदोन्नतीने भरले पाहिजे असताना म्हसाळ यांची नियुक्ती नियमबाह्य आहे . पालिका अधिकाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे म्हाप्रळकर यांनी म्हटले आहे . या विरोधात मुख्यमंत्री आणि शासन कडे तक्रार करणार असून वेळ म्हसाळ ना हटवले नाही तर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे .