‘समृद्धी’च्या मोजणीला विरोध
By admin | Published: April 9, 2017 01:06 AM2017-04-09T01:06:41+5:302017-04-09T01:06:41+5:30
मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये, ही शेतकऱ्यांची मागणी फेटाळून लावत शुक्रवारी कल्याण तालुक्यातील
टिटवाळा/बिर्लागेट : मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये, ही शेतकऱ्यांची मागणी फेटाळून लावत शुक्रवारी कल्याण तालुक्यातील राया, निंबवली, गुरवलीत जमिनीच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले. प्रचंड प्रमाणात पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, दंगलविरोधी पोलीस पथक तैनात करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत कडाडून विरोध केला. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.
मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाला गेले महिनाभर विरोध सुरू आहे. बाधित होणाऱ्या दहा गावांपैकी तीन गावांत जमिनीची मोजणी होणार असल्याने गुरूवारी पोलिसांनी शेतकऱ्यांची बैठक फळेगावात घेतली. तेव्हा मुख्यमंत्री, शरद पवार, संघर्ष समितीच्या नेत्यांची बैठक होईपर्यंत मोजणी करू नये, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तरीही मोजणीचा निर्णय झाल्याने राये गावाजवळ फळेगांव, उशीद, दानबाव, उतणे, चिंचवली, निंबवली, गुरवली, रूंदेव नदगाव येथील शेकडो शेतकरी काळ््या फिती लावून जमले. नंतर प्रचंड पोलीस फौजफाट्यासह कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे आणि मोजणी करणाऱ्या दोन टीम आल्या. पोलिसांच्या एका तुकडीने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखून धरले, तर दुसऱ्या तुकडीने मोजणी करणाऱ्यांना संरक्षण पुरवले. त्यानंतरही घोषणा सुरूच राहिल्याने राज्य राखीव पोलीस दल, दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आल्याने शेतकरी भडकले. (वार्ताहर)
समृद्धी महामार्गामुळे कल्याणच्या ग्रामीण भागातील १०७ हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. मोजणीनंतरच कुणाची किती जमीन जाईल, ते समजेल. त्यात कोणतीही जबरदस्ती करण्यात येत नाही. सध्या राया, निंबवली व गुरवलीत मोजणी झाली आहे.
- किरण सुरवसे,
तहसीलदार ,कल्याण
ही सरकारची हुकूमशाही व जबरदस्ती आहे.शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही राज्यातून शेतकऱ्यांना एकत्र करू.- विश्वनाथ पाटील, कुणबी सेनाप्रमुख
शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असतानाही पोलिसी बळाचा वापर करून हा सर्व्हे केल्याने भविष्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
- चंद्रकांत भोईर, समन्वयक, संघर्ष समिती, कल्याण
मोजणी शांततेत सुरू होती. शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यांनी स्वत:हून जेलभरो आंदोलन केले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले.
- प्रशांत कदम, अप्पर पोलीस अधीक्षक