बिल्डरांसाठी ‘मेट्रो’ वंजारपट्टीवरून नेण्यास दोन आमदारांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:20 AM2020-03-06T01:20:17+5:302020-03-06T01:20:20+5:30
मेट्रोमार्गात बदल होण्याचे संकेत मिळाल्यानंतर या मार्गास आमदार महेश चौघुले व रईस शेख यांनी पाठिंबा दर्शवत विरोध करणाऱ्यांना समाजकंटक संबोधल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
भिवंडी : ठाणे- भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्प-५ अंतर्गत भिवंडीतील नियोजित मेट्रोमार्गात बदल होण्याचे संकेत मिळाल्यानंतर या मार्गास आमदार महेश चौघुले व रईस शेख यांनी पाठिंबा दर्शवत विरोध करणाऱ्यांना समाजकंटक संबोधल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही आमदार हे रिलायन्स व इतर बांधकाम व्यावसायिक यांच्या फायद्यासाठी काम करत असल्याने ते वंजारपट्टी नाक्यावरून मेट्रोमार्ग नेण्यास विरोध करीत आहेत, असा आरोप कल्याणनाका व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीने गुरु वारी पत्रकार परिषदेत केला.
नियोजित मेट्रोमार्गामुळे कल्याण रोड येथील तब्बल १२०० व्यापारी व १७०० रहिवासी यांच्या मालमत्तांवर टाच येत असून येथील व्यापारी, रहिवासी तीन वर्षांपासून या प्रकल्पाच्या नियोजित मार्गास विरोध करत आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना फायद्याचे ठरेल, यासाठी हा मार्ग वंजारपट्टी-चाविंद्रामार्गे टेमघर, कल्याणच्या दिशेने नेल्यास त्याचा फायदा अधिक नागरिकांना होऊ शकेल, असे संघर्ष समितीचे निमंत्रक शादाब उस्मानी यांनी स्पष्ट केले.
आमचा मेट्रोस विरोध नसून त्याचा मार्ग संपूर्ण शहरासाठी सोयीस्कर असा वंजारपट्टीवरून नेण्यासाठी आमचा आग्रह आहे. नियोजित कल्याणनाका येथील मार्ग हा छोटे व्यापारी, गरीब कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारा आहे. या मार्गावरील व्यावसायिक व रहिवासी आतापर्यंत तीनवेळा रस्ता रुंदीकरणात बाधित झाले आहेत. त्यातच आता मेट्रोमुळे या मार्गावरील सर्व व्यावसायिक उद्ध्वस्त होणार असल्याने सुरुवातीपासून येथील नागरिकांनी या मेट्रोमार्गास विरोध केला आहे.
पत्रकार परिषदेस संघर्ष समितीचे राम लहारे, दिन मोहम्मद खान, मेहमूद मोमीन, राकेश पाल, सुधाकर अंचन, नईम खान, युसूफ सोलापूरकर, अनिल माणिकराव, नवीन गंगाराम, अस्लम हाफिजी, मुजाहिद शेख मैनूल शेख आदी उपस्थित होते.
>स्थानिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करून बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी हा मार्ग असल्याने व या परिसरात रिलायन्स प्रोग्रेसिव्ह ट्रेडर्स कंपनीच्या नावे जमीन खरेदी केली असल्याने त्यांच्या फायद्यासाठी भिवंडीतील आमदार कल्याण रोडच्या मार्गास पसंती देत असल्याचा आरोप उस्मानी यांनी केला.