वसईला सूर्याचे पाणी देण्यास विरोध
By admin | Published: May 5, 2017 05:35 AM2017-05-05T05:35:00+5:302017-05-05T05:35:00+5:30
सूर्या प्रकल्पामुळे दुबार पीक घेऊन दारिद्र्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वसई-विरार-भार्इंदरला
पालघर : सूर्या प्रकल्पामुळे दुबार पीक घेऊन दारिद्र्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वसई-विरार-भार्इंदरला बिगर सिंचनासाठी देऊन सरकार मोखाडा-जव्हार प्रमाणेच पालघर-डहाणू तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना कुपोषण व दारिद्र्याच्या खाईत ढकलू पहात असून त्याला प्राणपणाने विरोध करण्याचा निर्णय आज सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या निषेध सभेत घेण्यात आला. शहरांची तहान भागविण्यासाठी आदिवासी व शेतकऱ्यांचा बळी देण्याच्या या सरकारी धोरणविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचे एकमताने ठरले.
मासवणच्या सूर्या नदीतून वसई, विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या उदंचन केंद्राजवळच आज सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने निषेध सभेचे आयोजन केले होते. तिला माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष उत्तम पिंपळे,जि.प. चे उपाध्यक्ष सचिन पाटील,सभापती रवींद्र पागधरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, जितेंद्र राऊळ, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोशन पाटील ई. मान्यवरांसह डहाणू,पालघर मधील आदिवासी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघर्ष समितीचे निमंत्रक रमाकांत पाटील यांनी या प्रकल्पाचा खर्च आदिवासी उपयोजनेतून करण्यात आला असतांना त्याचा फायदा आदिवासी व शेतकऱ्यांना न देता तो शहरी भागाला देण्याचे सरकारचे धोरण आहे. आता पाणीच शिल्लक राहणार नसल्याने पालघर मधील २६ गाव योजनेसह पालघर, डहाणू तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आताच ह्या गंभीर प्रश्नाबाबत पेटून उठून आपले पाणी वाचविण्यासाठी संघर्षास तयार राहिले पाहिजे असे सांगितले.तर बऱ्हाणपूर, आंबेदे ह्या गावांना पाणी टंचाईच्या झळा लागायला आताच सुरुवात झाली असून भविष्यात पाण्यासाठी ओरड करण्यापेक्षा आपले पाणी आपल्यालाच मिळावे यासाठी संघर्ष समितीच्या लढ्यात सहभागी झाले पाहिजे असे अविनाश राऊत ह्यांनी सांगितले.सूर्याच्या पाण्यावर पहिला हक्क स्थानिकांचा असून जिल्ह्याला भेडसाविणाऱ्या पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्ना बाबत आपले लोकप्रतिनिधी आमदार उदासीन असल्याचे त्यांच्या गैरहजेरीतून दिसून आल्याने दीपेश पावडे ह्यांनी नाराजी व्यक्त करून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी गावोगावी बॅनर लावणार असल्याचे सांगितले.आपण यापूर्वीही एकत्र होतो तरीही आपले पाणी कसे पळविले गेले? असा प्रश्न या सूर्याच्या पाणी लढ्यातील आंदोलक पौर्णिमा मेहेर ह्यांनी उपस्थित करून या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना सरकार कडून अजूनही भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी एकमताच्या जोरावर हे पाणी वसई-विरार मध्ये पळविले असताना त्यांच्या नेत्यांना निवडून देण्यासाठी आपण आज झटतोय ह्यावर गांभीर्याने विचार करायला हवा असेही त्यांनी शेवटी सांगितले.
जिल्ह्यातील पश्चिम भागालाही पाणी टंचाईच्या झळा बसत असताना त्या भागातील लोक इथे सभेला गैरहजर असल्याबाबत माहीमचे माजी सरपंच विकास मोरे ह्यांनी नाराजी व्यक्त करीत २६ गाव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन फोडून टाका. तेव्हाच लोकांना ह्या प्रश्नाचे गांभिर्य कळेल असे सांगितले. गरिबांच्या पाठिंब्यानेच आंदोलने उभी राहत असून श्रीमंतांना ह्या आंदोलनाचे काही सोयरसुतक राहिले नसल्याचे जितेंद्र राऊळ ह्यांनी सांगून पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न जीवनमरणाचा प्रश्न समजून हे आंदोलन उभे करू व विरार वाल्याना दणका देऊ असेही त्यांनी सांगितले. आपले शासन उदार मतवादी नसून उदासमतवादी आहे असे सांगून आमच्या उरावर शासन बुलेट ट्रेन, बडोदरा कॉरिडॉर, वाढवण बंदरासारखे प्रकल्प राबवून आम्हाला उद्ध्वस्त करू पहात असून एचडीआयएल प्रकल्पासाठी पाणी देण्याबाबत मी विरीधं दर्शवून त्यांचे नाव यादीतून काढले असताना ह्या सरकारने त्यांचे नाव पुन्हा यादीत टाकून स्थानिकांचा भ्रमनिरास केल्याचे माजी राज्यमंत्री गवितांनी सांगितले.
या व्यक्तीचा शोध घ्या
माहीम ग्रामपंचायतीने ह्या विरोधात ठराव केला असून वसईकरांना सूर्याचे पाणी मिळावे म्हणून मंत्रालयात त्यांची कागदपत्रे हलविणारी व त्यांच्या पैशावर पालघर मध्ये बंगला बांधून राहणारी व्यक्ती कोण ह्याचा शोध घेऊन त्याला अद्दल घडविण्याची मागणी मोरे ह्यांनी केली.
अनेक राजकीय लोकांचा विरार वाल्यांशी असणारा वैयक्तिक संबंध तोडून गरिबांच्या हक्कासाठी आता त्यांना वाईटपणा घ्यावाच लागेल असे जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे ह्यांनी सांगितले.