...अन् बालपणीच्या खेळांत रमले आजी-आजोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:09 AM2019-01-16T00:09:55+5:302019-01-16T00:11:34+5:30
विद्यानिकेतन शाळेत रंगले संमेलन : ४०० हून अधिक जणांनी घेतला सहभाग; संगीत, गायन, वादन, नृत्य मैफिलीचा लुटला आनंद
डोंबिवली : म्हातारपणातील सर्व व्याधी विसरून विटू-दांडू खेळण्यात कुणी मग्न होते, तर कुणी नातवाच्या शाळेत हरविलेले बालपण पुन्हा एकदा शोधत होते, कुणाला माहेरी आल्याचा भास झाला. पूर्वीच्या काळात अस्तित्वात असलेले एकमेव चॅनेलवरील निर्माते यांच्याशी साधलेला संवाद, त्या चॅनेलची धून, त्याकाळातील मालिकेचे पोस्टर यामुळे सर्वच जण भूतकाळात रमून गेले. निमित्त होते ते विद्यानिकेतन शाळेने घेतलेल्या आजी-आजोबा संमेलनाचे.
विद्यानिकेतन विद्यालयाच्या प्रांगणात आजी-आजोबा संमेलन सोमवारी भरविण्यात आले होते. शाळेचे संस्थापक विवेक पंडित अनेक वर्षे आजी-आजोबांसाठी हे संमेलन भरवत आहेत. शाळा हे एक कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थ्याशी निगडीत पालकांसाठी त्यांच्या आजी-आजोबांसाठी अनेक उपक्रम हाती घेतले जात असतात. आपल्या नातवाला शाळेच्या बसस्टॉपपर्यंत आजी-आजोबा सोडत असतात. पण, आपल्या नातवाची शाळा कशी आहे, हे आजी-आजोबांना समजावे म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पंडित यांनी सांगितले. या संमेलनात ४०० आजी-आजोबा सहभागी झाले होते. पालक सभा अथवा परीक्षांचा निकाल या दोन दिवशी विद्यार्थ्यांचे पालक शाळेत येतात. त्यातही आई अथवा वडील उपस्थित राहून आपल्या मुला-मुलींच्या विकासाचा आढावा घेत असतात. आजी-आजोबा यांनीही या संमेलनामुळे आपल्या नातवांच्या शाळेत आनंदाचे क्षण घालवता आले. तसेच या संमेलनामुळे सुप्तगुणांना वाव मिळाल्याचे आजी-आजोबा सांगतात.
संमेलनाच्या निमित्ताने शाळेतील शिक्षकांनी आजीच्या हातावर मेंदी काढली. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या दशकात निर्माते असणारे विजया जोगळेकर-धुमाळे आणि विनय धुमाळे यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. पुढील काही दिवसांत मुलाखती घेण्याचा चार हजारांचा विक्रम करणाऱ्या सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पंडित यांनी त्याचा सत्कार केला. प्रवीण पाटील यांनी काढलेली पोर्ट्रेट त्यांना भेट देण्यात आली. दाजी पणशीकर यांनी मराठी सरस्वती स्तोत्र सादर केले. या संमेलनात जुने खेळ खेळून आजी-आजोबांनी बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. विटू-दांडूसह भोवरा, चिपी, गोट्या, सागर गोटे, ब्यालसिंग बीम यांसारखे विविध खेळ खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला. आजी-आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, नृत्य अशा सांगीतिक मैफिलीचे आयोजन केले होते.
शिक्षकांनीही या संमेलनाचा आनंद लुटला. आजी-आजोबांना कोणतीही गोष्ट कमी पडत नाही ना, याची काळजी पंडित यांनी घेतली.
धुमाळे म्हणाले, ‘पूर्वीच्या काळी कार्यक्रमाची आखणी जी व्यक्ती करायची, तीच निर्माता असायची. जाहिराती जास्त नव्हत्या. सरकाराला दूरदर्शनाद्वारे कार्यक्रम करावे लागत होते, मात्र आता काळ बदलला आहे. पैसा खर्च करतो तोच निर्माता असे समीकरण झाले आहे. पूर्वीच्या काळातील निर्माता हा श्रीमंत होताच असे नाही. पैसा महत्त्वाचा नव्हता. त्यामुळे पूर्वीचा निर्माता आणि आतचे निर्माते यांच्यात खूप फरक आहे.
... आणि वय विसरून गेलो!
बालपणी खेळलेला विटू-दांडू गेली अनेक वर्षे हातातही घेतला नव्हता. आज विटू-दांडू पाहिला अन् खेळण्याचा मोह आवरला नाही. वय विसरून खेळात सहभागी झालो. या खेळात बालपण शोधू लागले. बालपणी विटू-दांडू खेळताना येणारी मजा पुन्हा अनुभवली. त्यामुळे चेहºयावर आनंद पसरल्याचे संमेलनाला पहिल्यांदाच आलेल्या आजी मधुरा मेहता सांगत होत्या. तर दुसरीकडे हातावर काढलेली मेहंदी, सकाळी नाश्त्यापासून जेवणापर्यंत केलेली सोय आणि आदरातिथ्य पाहून साºया व्याधी विसरून संमेलनात सहभागी झाल्याचे गोगटे आजींनी सांगितले.