या रे या सारे या; गोविंदा सण वाचवू या
By admin | Published: July 4, 2017 06:52 AM2017-07-04T06:52:33+5:302017-07-04T06:52:33+5:30
दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर व गोविंदांच्या वयावर घातलेले निर्बंध उठवावे, यासाठी आता महाराष्ट्रातील
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर व गोविंदांच्या वयावर घातलेले निर्बंध उठवावे, यासाठी आता महाराष्ट्रातील गोविंदा पथके सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत. येत्या बुधवारी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात महाआरती होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी ‘या रे या, सारे या गजाननाला आळवू या, महाआरती गाजवू या गोविंदा सण वाचवू या’ अशी साद सर्व गोविंदा पथकांना घालण्यात आली आहे. या वेळी सर्व गोविंदा आपापल्या पथकांचे टी-शर्ट घालून उपस्थित राहणार आहेत.
दहीहंडी उत्सवात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या गोविंदांच्या सहभागास बंदी आणि २० फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडी बांधण्यास बंदी हे निर्बंध २०१४ साली हायकोर्टाने आणले. त्या वेळी हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि हा उत्सव साजरा झाला. ही स्थगिती ५६ दिवसांची होती. स्थगिती उठल्याने २०१५ आणि २०१६ साली या उत्सवावर हे निर्बंध कायम राहिले. याबाबत, दोन वर्षांपासून गोविंदा पथके नाराजी व्यक्त करत आहेत. या दोन अटींविरोधात दहीहंडी समन्वय समिती आणि जय जवान गोविंदा पथकाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. तो आजही सुरू आहे. १५ आॅगस्टला दहीहंडी उत्सव असून ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधीच सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना केली जाणार आहे. दहीहंडी समन्वय समितीतर्फे५ जुलैला संध्याकाळी महाआरती आयोजित केली असून त्यात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, पालघर, नालासोपारा येथील जवळपास ५०० ते ६०० गोविंदा पथके सहभागी होणार आहेत.
‘ही साद आहे गोविंदा जगवण्यासाठी
ही तळमळ आहे जल्लोष टिकवण्यासाठी
या आरतीद्वारे सिद्धिविनायकाला आळवण्यासाठी तुम्हाला यावंच लागेल गोविंदा सण वाचवण्यासाठी...’ हा संदेश सोशल मीडियावर पाठवून पथकांना या महाआरतीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. ‘हीच वेळ आहे, आपण सगळे एकजूट होण्याची, सच्चा गोविंदा असाल आणि या सणासाठी थोडीशी आपुलकी तुमच्या मनात असेल, तर नक्की याल’ असा विश्वास समन्वय समितीने व्यक्त केला आहे.
गंडांतर दूर व्हावे, हीच इच्छा
आपल्या सणावर आलेले हे गंडांतर दूर व्हावे आणि मोकळ्या वातावरणात हा उत्सव पूर्वीसारखा जोमाने साजरा करता यावा, हेच मागणे मागण्यासाठी ही महाआरती असणार आहे. त्यानंतर, २०१७ मध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
- समीर पेंढारे, सचिव,
महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समिती