बेराेजगार तरुणाला वाढदिवसाला दिली फळबाग भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:36+5:302021-08-18T04:47:36+5:30
भातसानगर : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘झाडांचे शतक’ या हाकेला साद देऊन तरुणांनी स्वातंत्र्यदिनी एका बेराेजगार तरुणाला त्याच्या ...
भातसानगर : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘झाडांचे शतक’ या हाकेला साद देऊन तरुणांनी स्वातंत्र्यदिनी एका बेराेजगार तरुणाला त्याच्या वाढदिवशी अनाेखी भेट दिली. डाेळखांब परिसरातील पष्टपाडा गावातील राहणारा जयवंत पाेंढेकर हा हाेतकरू तरुण काही दिवसांपासून नाेकरीच्या शाेधात हाेता. त्याची ही तगमग ओळखून किन्हवली-डाेळखांब परिसरातील संवेदना ग्रुपमधील तरुणांनी त्याला राेजगार कसा उपलब्ध हाेईल, याचा विचार सुरू केला. त्यातून त्याला १०० फळझाडांची लागवड करून बाग तयार करण्याची संकल्पना सुचून ती प्रत्यक्षात आणली आहे.
जयवंत याचा १५ ऑगस्टला वाढदिवस येत असल्याने या दिवशी जयवंत यांच्या कुटुंबीयांची संमती घेऊन त्यांच्या मालकीच्या जागेत ५० केशर आंबे आणि ५० काजूच्या झाडांची लागवड करून फळबाग उभी केली. स्वातंत्र्यदिनी राबवलेल्या उपक्रमामुळे जयवंतसाठी शाश्वत स्वयंराेजगार उपलब्ध झाला आहे. या उपक्रमासाठी तरुणांच्या मेहनतीला परिसरातील कै. मल्हारी करण(मामा) यांच्या स्मरणार्थ नितीन करण, कै. यमुनाबाई हजारे (आजी) यांच्या स्मरणार्थ किशोरी घोडविंदे, तुषार सापळे (अल्याणी), सुनील विशे (मुगाव), विजय थोरात (वैशाखरे), प्रवीण दळवी (डोहळेपाडा), मिहीर भावसार (चिखली), रामनाथ देसले (चिखली) अशा अनेक सेवाभावी व्यक्तींचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी स्वागत विशे, सतीश कुलकर्णी, संदीप आरज, राहुल वेखंडे, राजेश ढमके, दिलीप पष्टे, राजेश पोंढेकर, भरत पोंढेकर, मनोज कनोजिया, विकास कनोजिया, जय पष्टे आदींनी विशेष मेहनत घेतली. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हाकेला साद देऊन या अनाेख्या उपक्रमातून निसर्गप्रेम जपता आल्याचे संवेदना ग्रुपचे सल्लागार रूपेश शिंगोळे यांनी सांगितले.
काेट
सध्या नाेकऱ्या नसल्यामुळे तरुणांची आर्थिक ओढाताण हाेत आहे. त्यामुळे मराठी होतकरू तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, हा संदेश देण्याच्या हेतूनेच हा उपक्रम राबविण्यात आला.
- हरेश कुलकर्णी, अध्यक्ष, अंजनीमाता संस्था
----
परिसरातील होतकरू तरुणाला यापेक्षा वाढदिवसाची वेगळी भेट आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगळी सलामी कोणती असू शकते.
- संजय गगे खरीडकर, अध्यक्ष, संवेदना ग्रुप