स्वच्छता सर्व्हेक्षणात वरचा क्रमांक गाठण्यासाठी पालिकेला ४ हजारांचा फिडबॅक आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 06:51 PM2018-01-14T18:51:08+5:302018-01-14T18:51:24+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेत येत्या २२ जानेवारीला स्वच्छता सर्व्हेक्षण पार पडणार असुन त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार आहे.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत येत्या २२ जानेवारीला स्वच्छता सर्व्हेक्षण पार पडणार असुन त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार आहे. या सर्व्हेक्षणात पालिकेला अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी ४ हजार लोकांकडून स्वच्छता मोबाईल अॅपद्वारे फिडबॅक मिळण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत असून त्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास शहरात स्वच्छता नांदेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
पालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्व्हेक्षणात अव्वल क्रमांत प्राप्त करण्यासाठी कंबर कसली असली तरी त्याला राजकीय इच्छाशक्तींच्या अभावामुळे नागरिकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा केला जात आहे. पालिकेकडून लोकप्रतिनिधींचे प्रबोधन करण्यासाठी अनेकदा कार्यशाळेचे आयोजन केले. मात्र त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. ११ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरसावे उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सर्व उपस्थितांना पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपाच्या लोकप्रतिनिधींना निर्देश देत स्वच्छता मोहिमेत प्रशासनाचे हात बळकट करण्याचे निर्देश दिले.
गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजपा व आयुक्तांमध्ये शीतयुद्ध तापू लागल्याची चर्चा सुरु आहे. त्यातूनच असहकार्याचे सूप वाजू लागल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शहराला स्वच्छतेत अव्वल क्रमांक मिळवुन देण्याची सत्ताधा-यांची इच्छा नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गतवर्षी शहराचा देशात १६५ वा क्रमांक आल्याची माहिती देत यंदाच्या सर्व्हेक्षणात मात्र ३५ व्या क्रमांकावर पालिका स्थिरावल्याचे सांगितले. हा क्रमांक पहिल्या २० क्रमांकात समाविष्ट होण्यासाठी पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यांच्या या आवाहनाला सत्ताधारी, आयुक्तांसोबतच्या शीतयुद्धाला बाजूला सारून शहराला स्वच्छतेत सन्मान मिळवून देतील, अशी आस प्रशासनाला लागून राहिली आहे. यंदाच्या सर्व्हेक्षणात पालिका मुंबई प्रादेशिक विभागात अपेक्षित क्रमांकाच्या जवळपास पोहोचली असून, राज्यातही काही अंतर अव्वल क्रमांकापासून दूर असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वच्छता मोबईल अॅप डाऊनलोड करणा-यांची संख्या २० हजारांपर्यंत पोहोचली असली तरी त्यापैकी सुमारे ४ हजार लोकांकडून स्वच्छतेचा फिडबॅक दिला जात आहे. फिडबॅक देणा-यांपैकी सुमारे ९० टक्के लोकं स्वच्छतेत समाधानी असल्याचे सांगितले जात असून, त्यात सुमारे ४ हजार फिडबॅक वाढण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी रिअल टाईमनुसारच स्वच्छता मोबाईल अॅपवर तक्रार पोस्ट करावी, असे अपेक्षित असून अनेकदा चुकीची तक्रार पोस्ट केली जाते. त्यामुळे अस्वच्छतेची निश्चित ठिकाणं सापडण्यात अडथळा निर्माण होतो. रिअल टाईलनुसार प्राप्त तक्रारीवर १२ तासांत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी प्राधान्य दिल्यास केवळ सर्व्हेक्षणापुरते नव्हे तर शहर कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यास मदतच होईल, असंही आयुक्त डॉ. नरेश गीते म्हणाले आहेत.