मागवा... कटिंग सँडविच, कटिंग पिझ्झा
By Admin | Published: April 13, 2017 03:27 AM2017-04-13T03:27:08+5:302017-04-13T03:27:08+5:30
यापुढे हॉटेलात गेल्यावर तुम्हाला कटिंग सँडविच मिळेल, कटिंग पिझ्झा मिळेल... एवढेच कशाला हाफ पाणीपुरी, अर्धा रगडाही मागवता येईल, अशी तिरकस प्रतिक्रिया बुधवारी
ठाणे : यापुढे हॉटेलात गेल्यावर तुम्हाला कटिंग सँडविच मिळेल, कटिंग पिझ्झा मिळेल... एवढेच कशाला हाफ पाणीपुरी, अर्धा रगडाही मागवता येईल, अशी तिरकस प्रतिक्रिया बुधवारी ठाणे-डोंबिवलीतील हॉटेलचालकांनी दिली.
अन्न वाया जाऊ न देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ छेडताच केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पास्वान यांनी हॉटेलमध्ये मागेल तेवढाच पदार्थ देण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. आधीच महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारूबंदीच्या निर्णयाचा फटका सोसत असताना सरकारच्या या नव्या निर्णयामुळे हॉटेल चालवणे कठीण होईल, अशी अगतिकताही त्यांनी व्यक्त केली. पण आधीच अडचणीत आल्याने प्रतिक्रिया देऊन आणखी अडचणीत आणू नका, असे सांगत त्यांनी नावानिशी या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
एखाद्याला किती भूक आहे, यावर हॉटेलमधील पदार्थाची क्वान्टिटी (प्रमाण) ठरत नाही. तर एखादा पदार्थ एखादी व्यक्ती साधारण किती खाऊ शकेल यावर त्याचे प्रमाण ठरलेले असते. आॅर्डर घेतल्यावर आम्ही, आमचे वेटर अनेकदा तो पदार्थ किती जणांना पुरेल तेही सांगतो. बऱ्याचदा एक कप चहा किंवा कॉफी घेतल्यावर सोबत रिकामा कप देतो किंवा एखादे सूप, सरबत, मिल्क शेक ‘वन बाय टू’ करून दिले जाते. उरलेले अन्न पार्सल करून-बांधूनही दिले जाते. पण एखाद्याने अर्धवट खाऊन अन्न टाकले, तर त्याला हॉटेलचालक काय करणार? येथे वैयक्तिक सवय-संस्कार महत्त्वाचा ठरतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शिल्लक राहिलेले अन्न पूर्वी अनेक हॉटेलचालक गरीबांना वाटत असत. त्यातून त्यांचे पोट भरत असे. त्यांना चांगले अन्न मिळत असे. पण हे अन्न खराब झाले, तर त्यातून विषबाधेचा धोका उद््भवू शकतो हे लक्षात आल्यावर ते बंद झाले. शिजवलेले जे पदार्थ टिकू शकतात, ते आम्हीही उकीरड्यावर टाकत नाही. आम्हालाही अन्नाची किंमत कळते, असा मुद्दा हॉटेलचालकांनी मांडला. (प्रतिनिधी)
गोदामातील नासाडी थांबवा : सरकारी गोदामात धान्य साठवताना अन्नाची मोठी नासाडी होते. शेतमालाला भाव न मिळाल्याने कृषी मालाची, दूध-भाजीपाल्याची नासाडी होते, यावर आधी उपाय योजा आणि नंतर हॉटेलमधील पदार्थांचे प्रमाण ठरवा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. हॉटेलच्या थाळीत किती पुऱ्या वाढायच्या हे ठरवण्यापेक्षाही देशासमोर अनेक मोठे प्रश्न असल्याचा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.
आठवला... वरीचा भात
लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी तांदळाच्या टंचाईवर उपाय म्हणून वरीचा भात (भगर) खाण्याचे आवाहन केले होते. तेव्हा हॉटेलमध्ये तो मिळत होता. इतरवेळीही एखाद्या पदार्थाची टंचाई असेल तर हॉटेलचालक त्याचा नक्की विचार करतात, याचा दाखला त्यांनी दिला.
मर्यादित थाळीची सोय आधीपासूनच उपलब्ध
एखाद्याला कमी भूक असेल, तर त्याच्यासाठी मोजके पदार्थ असलेली मर्यादित थाळी मागवण्याची सोय खूप आधीपासून उपलब्ध आहे.
प्रसंगी चटणी, सांबार नको असेल; भातही कमी हवा असेल तरी मिळतो. फक्त मेन्यू कार्डवर तसा उल्लेख नसतो. आता तो करावा लागेल, असे खानावळचालकांनी सांगितले.
लग्नकार्य, राजकीय नेत्यांची वाढदिवसाची पार्टी, भोजनावळी येथे वाया जाणाऱ्या अन्नाचे काय? तेथे आधी हा नियम लागू करा, यावर त्यांनी बोट ठेवले.