ठाणे परिवहनची प्रतिमा सुधारण्याचे आदेश
By admin | Published: July 28, 2016 03:42 AM2016-07-28T03:42:01+5:302016-07-28T03:42:01+5:30
ठाणे परिवहनच्या कारभाराबाबत लोकमतमध्ये आॅन दी स्पॉट रिपोर्टरअंतर्गत केलेल्या झाडाझडतीनंतर त्याची दखल परिवहन समिती आणि महासभेने घेतल्यानंतर आता महापौर संजय मोरे
ठाणे : ठाणे परिवहनच्या कारभाराबाबत लोकमतमध्ये आॅन दी स्पॉट रिपोर्टरअंतर्गत केलेल्या झाडाझडतीनंतर त्याची दखल परिवहन समिती आणि महासभेने घेतल्यानंतर आता महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील टीएमटीचा कारभार सुधारण्यासाठी मंगळवारी परिवहन प्रशासनाची तब्बल दोन ते अडीच तास झाडाझडती घेतली. यामध्ये परिवहनची प्रतिमा सुधारा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा समजवजा दमच प्रशासनाला या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी भरला.
लोकमतने मागील आठवड्यात परिवहनमधील अनेक त्रुटींचा पाढा वाचला होता. कार्यशाळेबरोबरच कर्मचाऱ्यांचे प्रश्न, प्रशासनाची परिवहन प्रति असलेली मानसिकता या सर्वांचा समाचार घेतला होता. या बैठकीला उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती संजय वाघुले, सभागृह नेत्या अनिता गौरी आदींसह पालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत परिवहनच्या सध्या सुरू असलेल्या कारभाराचा समाचार घेतला. त्यानंतर, कामकाजाबाबत आणि काय समस्या आहेत, याचीही माहिती घेण्यात आली. परिवहनची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी परिवहनचा कारभार सुधारण्याची जबाबदारी ही परिवहन प्रशासनाची असून तो सुधारण्यासाठी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन महापौरांनी या वेळी दिले. आपसातील हेवेदावे, मतभेद बाजूला सारून परिवहनचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचनाही या वेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)
किरकोळ साहित्याअभावीदेखील बस आगाराबाहेर का पडत नाहीत, याचीही माहिती या वेळी आयुक्त आणि महापौरांनी जाणून घेतली. त्या बाहेर न पडल्याने परिवहनचाच तोटा होत आहे, त्यामुळे त्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत. बसदुरुस्तीसाठी आर्थिक मदत लागत असेल तर त्याचे प्रस्ताव तयार करून ते कायदेशीररीत्या मंजूर करून तत्काळ त्या दुरुस्त कराव्यात, असेही या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी जर काम करून रिझर्ल्ट दिला, तर त्यांच्या बाजूनेदेखील योग्य तो निर्णय घेतला जाईल.