निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील चार पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश
By जितेंद्र कालेकर | Published: February 21, 2019 10:02 PM2019-02-21T22:02:28+5:302019-02-21T22:18:38+5:30
वाहन चोरीच्या गुन्हयांचा छडा लावून आंतरराज्य टोळी पकडून एकाच वेळी १०५ गुन्हयांची उकल करुन तीन कोटी ४० लाख रुपये किंमतीची ८० वाहने जप्त करणारे ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांची आता ठाणे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे.
ठाणे: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह चार पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. स्वामी यांच्या जागी विशेष शाखेचे एस. एस. बुरसे यांची बदली झाली आहे. संपूर्ण राज्यात वाहन चोरीचे रेकॉर्डब्रेक गुन्हे उघड करुन आंतरराज्य वाहन चोरीतील नऊ जणांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून १८० चोरीच्या वाहनांपैकी १०५ गुन्हे उघड करणारे ठाणे शहर परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त स्वामी यांना आता गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आणण्यात आले आहे. वाहन चोरीमधील प्रकरणात स्वामी यांच्या पथकाने तीन कोटी ४० लाख किंमतीची ८० वाहने जप्त केली आहेत. शिवाय, मोबाईल चोरीचे गुन्हे उघड करण्यातही ठाणे शहर पोलिसांनी स्वामी यांच्या कार्यकाळात आघाडी घेतली. स्वामी यांच्या जागी आता विशेष शाखेचे एस. एस. बुरसे यांची बदली झाली आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय जाधव यांच्याकडे कल्याणच्या परिमंडळ तीनची सूत्रे देण्यात आली आहेत. कल्याणचे संजय शिंदे यांच्याकडे विशेष शाखेच्या उपायुक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. जिथे जाऊ तिथे चांगलीच कामगिरी करुन दाखवू, अशी प्रतिक्रीया स्वामी यांनी या बदलीनंतर व्यक्त केली.