ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेसाठी ठाण्यातील संघटनांचे राष्ट्रपतींना साकडे
By सुरेश लोखंडे | Published: May 19, 2023 07:58 PM2023-05-19T19:58:32+5:302023-05-19T19:59:01+5:30
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला स्थानिक पातळीवरही मिळतोय पाठिंबा
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नवी दिल्ली येथील जंतरमंतर राेडवर महिला पैलवानांनी आंदाेलन सुरू केलेले आहे. त्यास पाठिंबा देत आंदाेलनास अनुसरून मनमानी करणारे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना तात्काळ अटक करावी, त्यांना राजकीय व प्रशासकीय पदावरून हटवण्यात यावे आदी मागण्यांसाठी ठाण्यातील विविध संघटनांनी आज एकत्र येत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आज निवेदन दिले.
खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या या मनमानी विरोधात एकत्र येऊन महिला पैलवानांच्या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यातील जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, स्वराज अभियान, भारतीय महिला फेडरेशन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदीं संघटनांनी एकत्र आल्या आहेत. या संघटनेच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार रेवण लेंभे यांची भेट घेऊन त्यांनी राष्ट्रपती यांचे निवेदन त्यांना सुपुर्द केले. या निवेदनात त्यांनी सिंग यांना त्वरित अटक करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिष्टमंडळात समाजसेविका शुभदा चव्हाण, निर्मला पवार, जगदीश खैरालिया, अजित डफळे, डॉ संजय मंगला गोपाळ आणि सुब्रतो भट्टाचार्य आदीचा सहभाग हाेता.
निवेदनात खालील मागण्या-
- खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना तात्काळ अटक करा
- डब्ल्यूएफआयसह त्यांना राजकीय, प्रशासकीय पदांवरून हटवण्यात यावे.
- न्यायालयाच्या देखरेखीखाली पोलिस तपास सुरू करा
- निरीक्षण समितीच्या निष्कर्षांचा अहवाल सार्वजनिक करा