भिवंडीत टोरंट पावर विरोधात एकता संमेलनाचे आयोजन
By नितीन पंडित | Published: August 12, 2023 01:27 PM2023-08-12T13:27:48+5:302023-08-12T13:28:33+5:30
भिवंडी : भिवंडीत वीज वितरण व विज बिल वसूल करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्या विरोधात मागील काही दिवसांपासून अनेक मोर्चा ...
भिवंडी : भिवंडीत वीज वितरण व विज बिल वसूल करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्या विरोधात मागील काही दिवसांपासून अनेक मोर्चा व आंदोलने शहरात सुरु असतानाच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून टोरंट पावर कंपनी विरोधात भव्य एकता संमेलनाचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता वंजारपट्टी नाका परिसरातील खंडू पाडा रोड वरील बागे फिरदोस मार्केटच्या समोर करण्यात आले आहे अशी माहित टोरंट अत्याचार विरोधी जनसंघर्ष समितीचे संयोजक ऍड. किरण चन्ने यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेत फाजील अन्सारी, सुनील चव्हाण, इरफान शेख, प्रदीप बोडके, शेलार ग्रामपंचायतचे उपसरपंच ललित शेळके, तुफेल फारुकी, सलीम सिद्दिकी, अजिंक्य गायकवाड, मल्लेशम कोंडी, ऍड. अल्तमश अन्सारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे मात्र दुसरीकडे भिवंडीतील जनता टोरंट पावरच्या जाचक अटी नियमांमुळे आजही पारतंत्र्यात असल्याची भावना येथील नागरिकांमध्ये असून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहर व ग्रामीण भागातील जनता एकत्र येऊन स्वातंत्र दिनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून टोरेंट पावर कंपनीला चले जावो चा नारा देऊन शहरातून हद्दपार करण्याची मागणी शासनाकडे करणारा आहे.
हे संमेलन एक प्रतिकात्मक आंदोलन असून स्वातंत्र्यदिनीच भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील जनता टोरंट पावर कंपनीकडून स्वातंत्र्याची मागणी करत आहोत म्हणून हे आंदोलन व संमेलन आयोजित केले असून हे आंदोलन शहर व ग्रामीण भागातील सर्व जाती धर्माचे, सर्व भाषिक जनतेचे आंदोलन असून या आंदोलनातून भिवंडीकरांच्या एकतेची प्रचिती देखील येणार असल्याची माहिती टोरंट अत्याचार विरोधी जनसंघर्ष समितीचे संयोजक एड. किरण चन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.