मॉरिशसमध्ये घुमणार हरिनामाचा गजर, आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 05:41 PM2019-07-06T17:41:25+5:302019-07-06T17:44:21+5:30
मॉरिशसमध्ये आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
ठाणे : सुमारे 70 टक्के मूळ भारतीय लोकसंख्या असलेल्या मॉरिशस या निसर्गाचं लेणं लाभलेल्या देशात गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून भारतातील रुढी-परंपरा-संसेकृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. याचा भाग म्हणून रविवार दि. 7 जुलै ते शुक्रवार दि. 12 जुलै 2019 या दरम्यान मॉरिशसमध्ये आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मॉरिशियस मराठी मंडळी फेडरेशनचे भारतातील समन्वयक दीपक दळवी यांनी दिली आहे.
मॉरिशसमधील मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मराठी स्पिकिंग युनियन या संस्था सदर महोत्सवाच्या मुख्य आयोजक असून, कास्कावेल येथील मराठी प्रेमवर्धक मंडळी, वाकवॉ येथील श्री मराठी धार्मिक सभा, मरेदी अल्बर्ट येथील मराठी उपकारी सभा, ग्लेन पार्क येथील मराठी कल्चरल सर्कल भवानी मंदीर, ब्यू बसीन येथील विनायक मंदीर या संस्था सह आयोजक आहेत. मॉरिशस मधील कास्कावेल येथे 122 वर्ष प्राचीन विठ्ठल-रखुमाईचे प्रशस्त मंदीर आहे. प्रती पंढरपूर मानल्या जाणाऱया या मंदिराला पंढरपूर पांडुरंग क्षेत्र मंदिर म्हटले जाते. गेली 122 वर्षे या ठिकाणी सातत्यपूर्ण विविध धार्मिक-सांस्कृतिक उपाम साजरे केले जातात. संपूर्ण मॉरिशस मधील मराठी माणसं मोठ्या श्रध्देने या मंदिरात येऊन आपला भक्तीभाव व्यक्त करतात. याच भावनेतून यावर्षी आषाढी एकादशीचे निमित्त साधून सहा दिवसांच्या आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मॉरिशियस मराठी मंडळी फेडरेशन चे भारतातील समन्वयक दीपक दळवी यांनी दिली आहे. या सहा दिवसांत 108 विठ्ठल भजने, पालखी सोहळा, भव्य कार रॅली, हरिपाठ, आरती, महाप्रसाद आदी भरगच्च कार्पामांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणारा संप्रदाय. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. वारी हा एक आनंदाचा सोहळा असतो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गांव-शहरांमधून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी अशी एक दिंड्या पताका नाचवत सामुदायिक अशी पदयात्रा होय. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आदी संतांची आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या वारीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. हरिनामाचा गजर करत वारीमध्ये सहभाग घेणारा प्रत्येकजण स्वर्गीय सुखाचा आनंद घेत असतो. हाच आनंदाचा ठेवा अनुभवण्यासाठी आणि महाराष्ट्राची परंपरा जतन करण्यासाठी मॉरिशस मधील मराठी मंडळी त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. म्हणूनच हा आषाढी हरिनाम महोत्सव जसा मॉरिशस मधील मराठी लोकांसाठी श्वास आहे, तसाच महाराष्ट्राच्या लोकांसाठीही अतिशय अभिमानाची-कौतुकाची घटना आहे.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून 6 दिवस वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तेही भारतापासून 6 हजार किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या देशात ही बाब महाराष्ट्राच्या उज्वल संस्कृतीमध्ये भर घालणारी आहे. मॉरिशसमध्ये जसे 122 वर्षे जुने असे विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे तसेच श्री महादेवाच्या भव्य मूर्तीसह तेरावे ज्योर्तिलिंग असलेले मंदिर, राधा-कृष्ण, साईबाबा अशी अनेक मंदिर आहेत. त्या मंदिरांमधून नित्यनेमाने विधीवत उपाम राबविले जातात, त्या मंदिरांचे पावित्र्य टिकविले जाते.