महादहीहंडी उत्सवाऐवजी यंदा आरोग्य शिबिराचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:28 PM2020-08-12T17:28:11+5:302020-08-12T17:29:00+5:30
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने महादहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी सारखे गर्दी जमवणारे उत्सव यावर्षी साजरे न करता साधेपणाने करावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ठाणे जांभळीनाका येथे साजरा होणारा महादहीहंडी उत्सव यावर्षी साजरा न करता त्याऐवजी या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने महादहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदाचे उत्सवाचे १८ वे वर्ष होते. दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर न करता आरोग्य शिबिराचे आयोजन आनंद चॅरीटेबल ट्रस्ट व ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. यात प्लाझ्मादान, रक्तदान, रॅपिड अँटिजन टेस्ट, आरोग्य तपासणी आदीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकानी आपली कोरोना तपासणी रॅपिड अँटिजन टेस्टद्वारे करून घेतली.
या आरोग्य शिबिरीत ठाणे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी देखील रक्तदान केले. त्यासोबतच वाडिया आरोग्य केंद्राच्या अँटिजेन टेस्ट प्रमुख डॉ. स्मिता शुक्ला यांनीही रक्तदान केले. उत्सवाची प्रथा म्हणून गोपिकांनी छोटी हंडी फोडली. यावेळी नगरसेवक सुधीर कोकाटे, सिध्दार्थ ओवळेकर, माजी नगरसेवक पवन कदम, माजी परिवहन सदस्य राजेश मोरे, शिवसेना ठाणे शहर विधान सभा प्रमुख हेमंत पवार , ठाणे नगर वाहतूक शाखा वरिष्ठ निरीक्षक मनोहर आव्हाड, महानगरपालिकेतर्फे उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे साहेब, ठामपा रक्तपेढीचे प्रमुख डॉ शिवकुमार कोरी, अँटिजन टेस्ट प्रमुख हेल्थ सेंटर ठामपा डॉ. स्मिता शुक्ला, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक मिलिंद कासारे आदी मान्यवर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्सवांच्या जागी आरोग्य शिबिर, प्लाझ्मा कलेक्शन आदी उपक्रम सुरू करावे असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून यावर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती खासदार राजन विचारे यानी दिली.