अंबरनाथकरांसाठी यंदाही शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन
By admin | Published: April 29, 2017 01:31 AM2017-04-29T01:31:13+5:302017-04-29T01:31:13+5:30
येथील प्राचीन शिव मंदिराच्या कलाकृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी शिवसेनेच्या वतीने २०१५ पासून शिव मंदिर महोत्सव होत आहे.
अंबरनाथ : येथील प्राचीन शिव मंदिराच्या कलाकृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी शिवसेनेच्या वतीने २०१५ पासून शिव मंदिर महोत्सव होत आहे. यंदा हा महोत्सव ५ ते ७ मे दरम्यान होणार आहे. महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या वर्षी हा महोत्सव दुष्काळामुळे रद्द केला होता. मात्र, यंदा हा महोत्सव पहिल्या वर्षापेक्षा दिमाखदार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यंदाच्या महोत्सवात कला, संगीत यांच्यासोबतच इतर कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ५ मे रोजी होणार असून आपल्या अक्षरांच्या जादूने रसिकांना खिळवून ठेवणारे अच्युत पालव यांच्या सादरीकरणाने उद्घाटन होईल. या वेळी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या गायनाचा कार्यक्र म रंगणार आहे.
दि.६ मे रोजी गझल गायक रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांचा कार्यक्र म होईल. शेवटच्या दिवशी म्हणजे ७ मे रोजी प्रसिद्ध संगीतकार सलीम-सुलेमान उपस्थित राहणार आहेत. यामुळे संगीतप्रेमींसाठी अनोखी पर्वणी असेल. या मुख्य कार्यक्र मासोबतच लहान मुलांना विविध खेळांची प्रात्यक्षिके, साहसी खेळ पाहता आणि अनुभवता येणार आहेत. शिव मंदिराशेजारील जागेत एक कृत्रिम तलाव तयार करून त्यात परदेशांतील मासे पाहायला मिळणार आहेत. तसेच येथे एक रंगमंचही तयार करण्यात येणार असून तरुण पिढीच्या मनावर नाव कोरणाऱ्या नऊ प्रसिद्ध रॉक बॅण्डचे सादरीकरण या ठिकाणी होणार आहे.
महोत्सवस्थळी प्रवेशद्वाराजवळच देशातील प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. शिल्पकारही आपल्या शिल्पकलेचे सादरीकरण करणार आहेत. या वेळी प्रेक्षकांना आवडत्या चित्रांची आणि शिल्पांची खरेदीही करता येणार आहे. खवय्यांसाठी खाद्यमेळाही असेल. (प्रतिनिधी)