भिवंडीत विनापरवाना फाइट क्लबचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:22 AM2020-12-15T00:22:21+5:302020-12-15T00:22:25+5:30
धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना, या ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन कोणीही करताना दिसले नाही. या ठिकाणी कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता, तसेच येथे सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला होता.
भिवंडी : शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पिराणी पाडा परिसरात असलेल्या यहीया कंपाउंड येथे रविवारी रात्री कोरोनामुळे लागू केलेले सर्व निर्बंध धाब्यावर बसवून विनापरवानगी भिवंडी फाइट क्लबचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला.
या खेळात दोन फायटर एका रिंगमध्ये प्रवेश करून फाइट करतात. ही फाइट पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना, या ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन कोणीही करताना दिसले नाही. या ठिकाणी कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता, तसेच येथे सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला होता. आयोजकांनी या फाइट सामन्यांसाठी कोणतीही परवानगी घेतली नसताना, यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचे लाइव्ह प्रक्षेपण सुरू होते.
ही बाब पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या फाइट क्लबचे आयोजक सलमान अब्दुल कयुम याच्या विरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या फाइट क्लबचे उद्घाटन रविवारी सायंकाळी भिवंडी पश्चिमचे भाजप आ. महेश चौगुले यांच्या हस्ते झाले होते. खुद्द आ. चौघुले यांच्या मुलाने या फाइट स्पर्धेत भाग घेत विजय मिळविला आहे. चौगुले यांच्या पुत्राने फाइट सुरू असताना डोक्यावर सेफ्टी हेल्मेट घातले नव्हते व सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारीही घेण्यात आली नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना या ठिकाणी कुणाच्याच चेहऱ्यावर मास्क नव्हता, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे यावेळी पार तीनतेरा वाजले होते.