उस्मानाबाद ते युरेका फोर्ब्स व्हाया सिग्नल शाळा; गजरे विकून 'त्याने' गाठलं यशाचं शिखर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 12:21 AM2020-08-28T00:21:57+5:302020-08-28T06:49:06+5:30
ठाण्याने मला अनुभव, माणसं, ओळख दिली; मोहन काळेची यशोगाथा
स्रेहा पावसकर
ठाणे : घरची परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे त्याकाळी पोट भरण्यासाठी उस्मानाबाद येथून घरातून पळून मी ठाणे गाठले होते. अभ्यास, उच्च कंपनीत नोकरी हे तर कुठेही ध्यानीमनी नव्हतं, पण ज्या सिग्नलवर काहीतरी विकून पोट भरत होतो, दिवस ढकलत होतो, त्याच सिग्नलवरील शाळेतून घेतलेल्या शिक्षणामुळे मी आज मोठ्या कंपनीत रुजू झालो आहे. खिशात एक पैसा नसतानाही ज्या शहरात आलो, त्या ठाणे-मुंबईने मला खूप काही दिलं. पोट तर भरलंच पण अनुभव दिला, चांगली माणसं दिली आणि आज स्वत:च्या पायावर उभं करून एक ओळखही दिली, असे कृतज्ञ आणि भावुक उद्गार आहेत, ते सिग्नल शाळेतून शिक्षण घेऊन युरेका फोर्ब्ससारख्या कंपनीत नोकरी मिळवणाऱ्या मोहन प्रभू काळे याचे.
ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठातर्फे पाच वर्षांपूर्वी तीनहातनाक्यावर सिग्नल शाळा सुरू झाली. त्यातून पहिल्यांदा दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्यांपैकी एक म्हणजे मोहन काळे. २०१३-१४ साली गावावरून एकटा पळून आल्यावर सुरुवातीला ठाण्यात त्याने बिगारीकाम केले. नंतर, तो सिग्नलवर छोट्यामोठ्या वस्तू विकू लागला. नंतर आईवडील आणि दोन भावांसह तो सिग्नलवरच राहू लागला. शिकण्याची इच्छा होती, पण परिस्थितीपुढे हतबल असल्याने त्याने शिक्षण अर्धवट सोडले होते. सिग्नल शाळेतून त्याला शिकण्याची पुन्हा एक संधी मिळाली. गजरे विकून अभ्यास केला. दहावीत ७२ टक्के गुण मिळाल्यावर तत्कालीन ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सहकार्याने रुस्तमजी ग्लोबल करिअर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला. तेथे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. परंतु, इंग्रजीचा अभाव, हातात पुरेसे पैसे नसणे, नोकरी मिळवण्याबाबत फारशी कल्पना नसल्याने आपला हा डिप्लोमा करण्याचा निर्णय चुकला की काय, असे त्याला सारखे वाटत होते. मात्र, तरीही मेहनत करून त्याने इंग्रजी शिकून कॅम्पस मुलाखत दिली आणि त्याची युरेका फोर्ब्स कंपनीत निवड झाली. त्याचे कुटुंब पुन्हा गावी राहत असून तो बालस्रेहालय संस्थेच्या वसतिगृहात राहत आहे.
छोटं घर घेण्याचे स्वप्न
नोकरी मिळाल्याचे अजून आईवडिलांना सांगितलेले नाही. आता ते थकलेले असून वडील अपंग असल्याने त्यांचा मीच आधार आहे. त्यामुळे नोकरी करून ठाण्यात छोटं घर घेण्याचे स्वप्न असून त्यांना इथेच राहायला आणण्याचा विचार आहे. तसेच नोकरी करताकरता मास्टर्स पदवीही घ्यायची आहे, असे मोहनने ‘लोकमत’ला सांगितले.