इतर भाषिकांचे त्यांच्या भाषेवर प्रेम, आपणही आपल्या मराठीसाठी हट्ट केला पाहिजे - राज ठाकरे
By अजित मांडके | Published: February 27, 2024 09:39 PM2024-02-27T21:39:27+5:302024-02-27T21:40:13+5:30
ठाण्यात मनसेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते.
ठाणे : इतर भाषिक हे आपल्या भाषेवर प्रेम करतात मग आपण आपल्या मराठी भाषेसाठी का हट्ट करू नये असा सवाल मनसेचे आद्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आपल्या भाषेवर इतके संस्कार झाले असताना आपणच आपल्या भाषेपासून दूर जात आहोत, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ठाण्यात मनसेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली. निवडणूक तोंडवर आहे, तेव्हा असे कार्यक्रम ऐकायला मिळणार नाहीत तेव्हा आमचीच पकपक तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. यापूर्वी मराठी भाषा दिन केवळ तारखे पर्यंत मर्यादित होता. मनसेने २००७ मध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यास सुरवात केली आणि आता सर्वच जण हा दिन साजरा करीत आहेत. मात्र मराठी भाषा दिन केवळ एका दिवसापूर्त न राहता वर्षाचे ३६५ दिवस हा दिवस साजरा झाला पाहिजे असेही ते म्हणाले. इतर राज्यात आशा पद्धतीत दिवस साजरा करत असेल असे कुठे दिसत नाही, आपल्या राज्याला एक भूगोल आणि इतिहास आहे इथे अनेक संत, कवी होऊन गेले आहेत, त्यामुळे मराठी भाषेला एक वेगळा दर्जा आहे. इतर भाषेतील अनेक चित्रपट तेलगू, इतर भाषेत डब होतात मात्र मराठी भाषेत काही ठराविक चित्रपट डब होत आहेत पण मराठीत डब झालेले चित्रपट मी आवर्जून बघतो आपणच मराठीवर प्रेम करायला हवे असेही ते म्हणाले.
रवींद्रनाथ टागोर यांनी अनेक साहित्य लिहिले मात्र त्यांनी ते बंगाली भाषेत लिहिले त्यांना मॅगेसेस पुरस्कार मिळाला, सत्यजित रे याना अमेरिकेने ऑस्कर पुरस्कार दिला, त्यांनी आपली भाषा कधी सोडली नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मराठी भाषेत अनेक चित्रपट येत आहेत मात्र त्यात बदल होणे गरजेचे आहे नाटक आणि मराठी चित्रपटानी कात टाकणे गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले. एकूणच आपण मराठी साठी हट्ट धरला पाहिजे, इतर भाषिक आपल्या भाषेसाठी हट्ट धरतात आणि आपण आपल्याच भाषेपासून दूर जात आहोत अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मनसे मराठी भाषेसाठी एक शपथ घेऊन येणार आहे यात मराठी माणसाने मराठी भाषेसाठी काय केले पाहिजे यात असणार आहे, मराठी भाषा दिवस ३६५ दिवस साजरा करूया, मातृभाषा टिकवूया यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मराठी मान्यवरांचा सत्कार यावेळी राज यांच्या हस्ते करण्यात आला.