इतर तीन ठिकाणी भाजी विक्रेते आणि ग्राहक फिरकलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 03:28 PM2020-04-10T15:28:47+5:302020-04-10T15:31:35+5:30
ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील चार ठिकाणी भाजी मंडईची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी कॅडबरी वगळता शहरातील इतर तीन ठिकाणी एकही भाजी विक्रेता किंवा ग्राहक फिरकलाच नसल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे : जांभळी नाका येथील भाजी मंडईची गर्दी कमी व्हावी यासाठी पालिकेने दोन वेळा मंडई स्थलांतरीत केली. परंतु या दोन ठिकाणी नागरिकांची भाजी घेण्यासाठी गर्दी कायम असल्याचे उघड झाल्यानंतर अखेर गुरु वारी घोडबंदर भागातील बोरीवडे, कळव्यातील पारिसक नगर, ढोकाळी येथील हॉयलन्ड आणि रेमंड कंपनी येथील रस्त्यावर या मंडई सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्र वारी याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. मात्र रेमंड कंपनी येथील पर्याय वगळता नागरिकांनी तसेच भाजी विक्रेत्यांनी या तीनही ठिकाणी अक्षरश: पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यास भाजी विक्रेते आणि नागरिक देखील उत्सुक नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
नागरीकांना वारंवार सूचना करूनही भाजी घेणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याने ठाणे महापालिकेने जांभळी नाका परिसरातील भाजी मंडई बंद करून ही भाजी मंडई दुसºया ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा प्रयोग केला होता. त्यानुसार ही मंडई सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केली होती. मात्र येथेही सोशल डिस्टेन्टसचा नियम पाळला जात नसल्याने अखेर ही मंडई जांभळी नाक्यावरील तीन रस्त्यांवर भरविण्यास सुरवात झाली होती. मात्र जांभळी नाका ते स्टेशनपर्यंत आणि जांभळी नाक्यावरील दोन भाजी मंडईतील गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देण्यासारखीच होती. पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आवाहन करु नही नागरीक याला हरताळ फासतांनाच दिसत होते. त्यामुळे गुरु वारी पुन्हा या संदर्भात बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात आला. घोडबंदर पट्ट्यातील दोन ठिकाणी एक कॅडबरी आणि एक जागा पारसिकच्या ठिकाणी निश्चित करण्यात आली. मात्र शुक्र वारी केवळ कॅडबरी परिसरात भाजी मंडई सुरू होऊ शकली असून इतर ठिकाणी भाजी विक्र ेते आणि नागरिक फिरकलेच नाहीत.
भाजी मंडई या चार ठिकणी सुरु करण्याचा निर्णय काल उशिरा झाल्याने ही माहिती सर्व भाजी विक्रेत्यांपर्यंत गेली नसावी अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जांभळी नाका परिसरातील भाजी मंडई हटवणे हा यामागचा प्रमुख उद्देश होता तो सफल झाला असून आता हे नवीन पर्याय भाजी विक्र ेत्यांनी स्वीकारायचे की नाही तो त्यांचा प्रश्न असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.