समाधानाचे अन्य मार्ग शोधता आले पाहिजेत; रोहिणी हट्टंगडी यांचा मोलाचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:05 AM2018-12-09T00:05:46+5:302018-12-09T00:06:01+5:30
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधील आठवणींना दिला उजाळा
ठाणे : मला थिएटर मध्ये समाधान मिळत गेले त्यामुळे अद्याप मी ते करत आहे. तरीदेखील कधी आपल्या मनासारखे झाले नाही तर आपल्याला समाधानाचे अन्य मार्ग शोधता आले पाहिजेत, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी शुक्र वारी एका कार्यक्रमात व्यक्त केले.
हट्टंगडी पुढे म्हणाल्या की, कलाकाराच्या आयुष्यात नाटकाचा पहिला प्रयोग हा यशाचे शिखर असू शकत नाही. तसेच मी केलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग आणि त्याच नाटकाचा केलेला १०० वा प्रयोग यात जमीन आसमानचा फरक असतो. त्यात अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळत जाते. त्यामुळेच नाटकाचा प्रत्येक प्रयोगाला प्रयोग म्हटले जाते. मात्र, प्रत्येक प्रयोगात कलाकारांची मानसिकता, मनस्थिती, ठिकाण, रसिक, तांत्रिक गोष्टी या वेगवेगळ््या असतात. यावेळी त्यांनी ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’मधील (एनएसडी) आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, एनएसडीमध्ये जाईपर्यंत मी अभिनय क्षेत्रात येण्याचे निश्चित केले नव्हते. मात्र, शाळा - महाविद्यालयात असताना मी छोट्या - मोठ्या भूमिका करत असे. १९६० मध्ये इंडस्ट्रियल नाटकाच्या स्पर्धेच्या निमित्ताने मी अभिनय करण्यास सुरुवात केली. तसेच राज्यनाट्य स्पर्धादेखील गाजवत होते. खरंतर मला बीएससी झाल्यावर डॉक्टर व्हायचे होते. मात्र, त्याकाळी मला ससूनला अॅडमिशन न मिळाल्यामुळे ते राहून गेले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, एनएसडीची अॅडमिशन मिळाल्यावर मी नाटकाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रभाकर पणशीकर, श्रीराम लागू यांची नाटके खूप गाजत होती. ते बघून व्यावसायिक नाटकासाठी काम करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील नाटक, सिनेमा, मालिका यांच्या गमतीजमती आणि किस्से सांगितले.
ग्लॅमर हा साइड इफेक्ट
आता अभिनय क्षेत्रात काम करणे खूप सुकर झाले असून मी पैशासाठी कधीच काम केले नाही तर मला केलेल्या कामातून पैसा मिळत गेला. मात्र,त्यासाठी चांगली भूमिका मिळणेही आवश्यक आहे. मी कधी ग्लॅमरच्या मागे जात नाही, तर माझ्या कामातून ग्लॅमर आपसूक येते. आजवर मी कधीच ग्लॅमरसाठी काम केले नसून ग्लॅमर हा साइड इफेक्ट आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.