...अन्यथा चार तास रिक्षा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:52 AM2018-07-23T02:52:38+5:302018-07-23T02:53:50+5:30
रिक्षाचालकांनी दिला इशारा; कोंडीमुळे ‘नको रे बाबा कल्याण’ म्हणण्याची वेळ
कल्याण : सद्यस्थितीत शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसागणिक जटील होत चालला आहे. एक ते दीड तास या कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने ‘नको रे बाबा कल्याण’, अशी म्हणण्याची वेळ शहराबाहेरील वाहनचालकांवर आली आहे. या कोंडीचा फटका रिक्षाचालकांनाही मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. याचा परिणाम व्यवसायावर देखील होत आहे. वाहतूककोंडीवर पर्याय काढण्यात यावा अन्यथा बुधवार, २५ जुलैपासून ऐन गर्दीच्या वेळी चार तास रिक्षा बंद ठेवण्याचा इशारा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, कल्याण - डोंबिवलीतील वाहतूक समस्येचे नियोजन आणि प्रवाशांकडून होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने कल्याण आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांनी मंगळवारी रिक्षासंघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक बोलावली आहे.
जुना पत्रीपूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या वाहनांना जुन्या पुलावरून वाहतूक बंद केली असली तरी त्यांना रात्री ११ ते पहाटे ५ च्या दरम्यान नवीन पत्रीपुलावरून जाण्यास मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी होऊनही अवजड वाहनांची वाहतूक दिवसाढवळ्या सुरू असून त्यात त्यांची वाहतूक नवीन पत्रीपुलावरून वळवण्यात येत असल्याने कोंडीत अधिकच वाढ झाली आहे. जुन्या पत्रीपुलावरून कल्याणच्या दिशेने अन्य वाहनांची होणारी वाहतूक आणि अवजड वाहनांची नवीन पत्रीपुलावरून गोविंदवाडी बायपासकडे जाणाºया वाहतुकीमुळे बायपासच्या चौकातच मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. पत्रीपुलासह, सुभाष चौक - मुरबाड रोड, वालधुनी उड्डाणपूल, बैलबाजार चौक, सहजानंद चौक, रेल्वे स्थानक रोड, दुर्गाडी चौक येथे मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांना कोंडीला सामोरे जावे लागते आहे. दीड तासांपर्यंत कोंडीत अडकून पडत असल्याने वेळेसह इंधनही मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. दरम्यान, संबंधित रस्ते आणि चौक हे रेल्वे स्थानकाकडे येणारे महत्त्वाचे मार्ग असल्याने रिक्षाचालकांना या सतत होणाºया कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो आहे. कोंडीने त्रस्त रिक्षाचालकांनी तर आता बुधवारपासून चार तास रिक्षा बंद ठेवून कोंडीचा निषेध करण्याचा इशारा वाहतूक शाखा उपायुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना रिक्षा चालक मालक असोसिएशनचे प्रकाश पेणकर, संतोष नवले, विलास वैद्य, जितू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आरटीओ कार्यालयात उद्या बैठक
कल्याण शहरातील वाहतूककोंडी त्याचबरोबर कल्याण आरटीओ परिक्षेत्राव्यतिरिक्त पासिंगसाठी बाहेरून येणाºया वाहनांमुळे होणारी कोंडी आणि डोंबिवली शहरातील वाहतूक समस्येचे नियोजन आणि प्रवाशांकडून होणाºया तक्रारींच्या अनुषंगाने मंगळवारी २४ जुलैला सायंकाळी साडेचार वाजता कल्याण आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांनी रिक्षासंघटनांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला दोन्ही शहरांमधील रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींसह वाहतूक शाखेचे सहा. पोलीस आयुक्त दीपक बांदेकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वाहतूककोंडीच्या मुद्द्यासह डोंबिवली पश्चिमेकडील भागात रिक्षाचालकांकडून बेकायदेशीररित्या मनमानीपणे जी भाडेवाढ करण्यात आली, त्याबाबत ससाणे काय कारवाई करतात, याकडेही साºयांचे लक्ष आहे.