...अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:23 AM2018-10-29T00:23:51+5:302018-10-29T00:24:13+5:30
असुविधांनी मिलापनगरमधील रहिवासी त्रस्त; थेट शिवसेना पक्षप्रमुखांना साकडे
डोंबिवली : पूर्वेकडील एमआयडीसी निवासी भागातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. या भागातील रस्त्यांची खड्ड्यांनी पुरती वाताहत झाली आहे. त्याचबरोबर अस्वच्छता, बिघडलेले आरोग्य, दिवाबत्तीची सुविधा नसणे अशा समस्यांनी त्रस्त झालेल्या रहिवासी महिलांनी तर येत्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. निवासी भागातील मिलापनगरमधील महिलांनी थेट शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास येणाºया निवडणुकांवर बहिष्कार टाकू, असा इशारा त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.
निवासी भागातील रस्त्यांची खड्ड्यांनी अक्षरश: चाळण झाली असताना फेरीवाला अतिक्रमण, गटारे तुंबणे, सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणे, कचरा न उचलणे, जंतुनाशक फवारणीचा अभाव, झाडांची छाटणी न होणे, अनधिकृत रिक्षास्टॅण्ड, अन्य प्राधिकरणांकडून होणाºया खोदकामांचा त्रास अशाही अनेक समस्यांना संबंधित रहिवाशांना तोंड द्यावे लागते आहे. गेल्या पावसाळ्याप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांची स्थिती कायम होती. धुळीचा त्रासही येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. याबाबत केडीएमसीला वारंवार पत्रव्यवहार करून या समस्येचा निपटारा करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. परंतु, आर्थिक चणचण असल्याचे कारण पुढे करत कोणतीही कृती आजवर महापालिका प्रशासनाकडून झालेली नाही. एमआयडीसी आणि केडीएमसी यांच्यातील समन्वयाचा अभाव या दुरवस्थेला कारणीभूत ठरला आहे.
स्थानिक प्रशासन आणि सत्ताधाºयांकडून होत असलेले दुर्लक्ष पाहता मिलापनगरमधील महिला रहिवाशांनी थेट सत्ताधारी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून साकडे घातले आहे. रस्ते, स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती आदी सेवांचा बोजवारा उडाला असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. १९९५ पासून याठिकाणी शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येत आहे, त्यात आमदार आणि खासदारही शिवसेनेचाच असल्याचे पत्रात नमूद केले आहे. नादुरुस्त रस्ते तात्पुरते दुरुस्त न करता कायमस्वरूपी चांगले रस्ते बनवले गेले पाहिजे. ही जबाबदारी केडीएमसी आणि एमआयडीसीकडून एकमेकांवर ढकलण्याचे काम सुरू असल्याने यात पादचारी आणि स्थानिक रहिवासी पुरता भरडला जात असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सुधारणा न झाल्यास महिला निवडणुकीवर बहिष्कार टाकतीलच, पण येथील २० हजार मतदारांनाही तसे आवाहन करू, असा इशारा देण्यात आला आहे. मिलापनगरमधील नीलम लाटकर, वर्षा महाडिक, उषा पोतनीस आदींसह ५० महिलांच्या स्वाक्षरीचे पत्र ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.
धुळीच्या त्रासाने आरोग्य बिघडले
आधीच याठिकाणी प्रदूषणाची मोठी समस्या आहे. हिरवा पाऊस, केमिकल कंपन्यांमधील स्फोट/आग लागणे यासारख्या घटना घडल्या आहेत. सद्य:स्थितीला धुळीचा प्रचंड त्रास होत असल्याने खोकला, दमा, वेळीअवेळी ताप येणे, घशाचे इन्फेक्शन आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी येथे डेंग्यूची साथ पसरली होती.