अन्यथा रस्त्यावर उतरू, गडसंवर्धन करणाऱ्यांचा सरकारला इशारा; राज ठाकरेंची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 12:18 AM2019-09-09T00:18:34+5:302019-09-09T00:18:53+5:30
राज ठाकरे हे दोन दिवसांच्या डोंबिवली दौºयावर आले होते.
डोंबिवली : ‘गडकिल्ले भाड्याने दिल्यास माझ्याशी गाठ आहे’, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला असताना रविवारी गडसंवर्धन करणाºया ११ संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची डोंबिवलीत भेट घेतली. गडकिल्ले वाचविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांच्याकडून यावेळी देण्यात आले. गडकिल्ल्यांसंदर्भात घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही संघटनांकडून यावेळी सरकारला देण्यात आला. व्यसनमुक्त शिवकिल्ले कायदा व्हावा, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
राज ठाकरे हे दोन दिवसांच्या डोंबिवली दौºयावर आले होते. शनिवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना गडकिल्ले भाड्याने देण्याच्या सरकारच्या धोरणावर टीका करताना मंत्र्यांनी त्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, अशीही सूचना केली. दरम्यान, रविवारी गडसंवर्धन करणाºया ११ संघटनांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. ठाकरे यांनी संबंधित विषयात लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावर गडकिल्ले संवर्धनाचे आश्वासन ठाकरे यांनी त्यांना दिले.
या संघटनांच्या माध्यमातून गेली १० वर्षे व्यसनमुक्त आणि प्लास्टिकमुक्त गडकिल्ले अभियान सुरू आहे. चित्र, व्यंगचित्र, पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून पाच वर्षांपूर्वी व्यसनमुक्त शिवकिल्ले कायद्याचा मसुदा बनवून हा कायदा व्हावा म्हणून १५० हून अधिक आमदारांना तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील ३०० किल्ले हेरिटेज हॉटेलसाठी देऊ केल्याकडेही ठाकरे यांचे लक्ष वेधण्यात आले. आम्ही सर्वच याचा विरोध करीत असून आपण याचे नेतृत्व करावे, अशी विनंती संबंधित संघटनांकडून करण्यात आली. याला ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे कल्याण शहराध्यक्ष निर्मल निगडे यांनी दिली.
मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
शनिवारपासून डोंबिवलीच्या दौºयावर आलेल्या राज यांनी रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी कल्याणचे पदाधिकारीही उपस्थित होते. राज यांनी उपस्थितांबरोबर राज्य आणि केंद्रातील चालू घडामोडींवर चर्चा केली. तसेच कोणाची काही तक्रार आहे का, काही बोलायचे आहे का, अशीही विचारणा केल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणुकीबाबत मनसेची भूमिका योग्य वेळी जाहीर करू, असे राज यांनी स्पष्ट केल्याने रविवारच्या बैठकीत निवडणुकीवर कोणतेही भाष्य त्यांनी केले नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. माध्यमांना या बैठकीत प्रवेश नव्हता.
दुपारी अडीचला मुंबईला रवाना
रविवारी सकाळी ११.३० ला बैठक आटोपल्यावर राज हे त्यांचे पांडुरंगवाडीमधील मित्र सुशील आगरकर यांच्या निवासस्थानी पूजेच्या निमित्ताने गेले होते. तेथून दुपारी अडीचच्या सुमारास मुंबईला रवाना झाले.