...अन्यथा कायदेशीर कारवाई करणार
By admin | Published: February 3, 2017 03:12 AM2017-02-03T03:12:10+5:302017-02-03T03:12:10+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका प्रस्तावित असतानाही आजवर सरकारने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका प्रस्तावित असतानाही आजवर सरकारने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी डोंबिवलीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटनाला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवले जाणार आहेत. मात्र, मानपाडा पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांना नोटीस बजावली आहे. आंदोलन छेडल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला आहे.
२७ गावे केडीएमसीतून वगळण्यासंदर्भात सर्व पक्षांच्या संघर्ष समितीला दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळावे. साहित्य संमेलनापूर्वी याप्रकरणी ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा, संमेलनस्थळी त्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी नोव्हेंबरमध्ये डोंबिवलीत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात दिला होता. दरम्यान, २७ गावे न वगळल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटनाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पाटील यांनी यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पत्र पाठवून परवानगी मागितली होती. त्यावर, मानपाडा पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. (प्रतिनिधी)
संघर्ष समिती कोमात, राष्ट्रवादी जोमात
२७ गावांचा स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणारी संघर्ष समिती या राष्ट्रवादीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने कोमात गेल्याचे चित्र आहे. संघर्ष समितीचे उपाध्यक्ष असलेले गुलाब वझे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आयोजक संस्थेचे अध्यक्षही आहेत. विशेष म्हणजे वझे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारीही आहेत. एकीकडे संमेलनाचे आयोजक, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे वझे यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.