अन्यथा जाहीरात फलक परवानगी होणार रद्द
By अजित मांडके | Published: February 14, 2024 04:38 PM2024-02-14T16:38:22+5:302024-02-14T16:38:50+5:30
जेवढ्या आकाराची परवानगी घेतली असले तेवढेच होर्डींग्ज लावा अन्यथा कारवाईला सोमेरे जा असा इशाराही देखील या नोटीसीद्वारे दिला आहे.
ठाणे :ठाणे महापालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकारमानाचे जाहीरात फलक प्रदर्शित केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातून पालिकेचे कोट्यावधीचे नुकसान होत असून संबधीत जाहीरात महापालिकेची फसवणुक करीत असल्याचेही निर्दशनास आले आहे. अखेर ठाणे महापालिकेच्या जाहीरात विभागाने अशांचा सर्व्हे करुन शहरातील सुमारे ९० होर्डींग्जला नोटीसा बजावल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जेवढ्या आकाराची परवानगी घेतली असले तेवढेच होर्डींग्ज लावा अन्यथा कारवाईला सोमेरे जा असा इशाराही देखील या नोटीसीद्वारे दिला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी जाहीरात विभाग असून जाहीरात फलक उभारण्यासाठी ज्या परवानग्या दिल्या जातात, त्यावर जाहीरात कर आकारुन त्यावर निधी उभारण्याचा स्त्रोताचा समावेश आहे. परंतु असे असले तरी महापालिकेकडून आकारले जाणारे जाहीरात प्रसिध्दीचे दरही फार कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यातही ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत आणि अनाधिकृतरित्या विविध ठिकाणी जाहीरातींचे मोठे होर्डींग्ज लावले जात आहेत. दुसरीकडे अधिकृत जाहीरातदारांनी देखील महापालिकेची कशी फसवणुक केली, याची धक्कादायक माहितीच दक्ष नागरीक चंद्रहास तावडे यांनी समोर आणली आहे.
माहिती अधिकारात त्यांनी ही माहिती मिळविली असून अशा जाहीरातदारांची यादीच त्यांनी तयार केली आहे. या यादीच्या द्वारे त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन अशा जाहीरातदारांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती.
महापालिकेने ज्या ठिकाणी ४० बाय २० चौरस फुट मंजुरी दिली असतांना त्याठिकाणी प्रत्यक्ष मोजमाप केले असता ४० बाय ४० चौरस फुट आकारचे दिसून आले आहे. असाच प्रकार इतर ठिकाणी देखील दिसून आला आहे. त्यानुसार कळवा प्रभाग समितीत १, वागळेमध्ये २, दिवा ४, वर्तकनगर ११, माजिवडा मानपाडा ४३, नौपाडा ४, उथळसर प्रभाग समितीत ४ ठिकाणी अशी तफावती आढळल्या आहेत.
दरम्यान आता ठाणे महापालिकेच्या जाहीरात विभागाने अशा जाहीरातदारांच्या विरोधात नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. ४० बाय २०० मोजमापाचे जाहीरात प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली असतांना ४० बाय ४० मोजमापाचे जाहीरात फलक लावण्यात आल्याने ते अनाधिकृत ठरत असल्याचे नोटीसीमध्ये नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार नोटीस मिळाल्यानंतर पुढील ४८ तासात जाहीरात फलकाचे आकारमान कमी करावे, तसेच विहित मुदतीत प्रशासन शुल्क न भरल्यास व त्या कालावधीत वाढीव मोजमापाची जाहीरात फी व पाचपट प्रशासन शुल्काचा भरणा करावा, तसेच आपले जाहीरात फलक नियमित करुन न घेतल्यास जाहीरात फलक परवानगी रद्द करण्यात येईल असेही नोटीस मध्ये नमुद करण्यात आले.