अन्यथा २७ नोव्हेंबरपासून हजारो कंत्राटदार उतरणार रस्त्यावर, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा इशारा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 22, 2023 01:26 PM2023-11-22T13:26:31+5:302023-11-22T13:26:43+5:30
या आंदोलनात हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामे, विद्युत विभागाची कामे बंद करण्यात येतील असे आवळे यांनी सांगितले.
ठाणे : राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे प्रलंबित देयके तातडीने द्यावी व इतर अनेक अडचणी तातडीने सोडवावी अन्यथा सोमवार २७ नोव्हेंबर पासुन राज्यभर सर्व विभागाकडील काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघचे ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकावं की आमच्याकडे निधी देण्यासाठी पैसा नाही, मग आम्ही आत्महत्या करून टाकू असेही त्यांनी इशाऱ्यात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास जलसंपदा सर्व विभागाचे विकासाचे कामे करणारे कंत्राटदार हे राज्यातीलच विकासाची कामे करूनच अडचणीत आले आहे. यावर वारंवार संघटनेने शासनाच्या निर्दनास स्मरणपत्रे द्वारे आणले असताना त्यांच्याकडून या गंभीर विषयाबाबत काहीही उपाययोजना केली जात नाही. मुख्यमंत्री यांनी कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातील कंत्राटदार या सर्व विभागाची चालू असलेली व निविदा प्रक्रिया मध्ये असलेली विकासाची कामे सोमवार २७ नोव्हेंबर पासुन कामे बंद करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनात हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामे, विद्युत विभागाची कामे बंद करण्यात येतील असे आवळे यांनी सांगितले. हे कंत्राटदार मध्यमवर्गातील आहेत. दिवाळी होऊन ही त्यांना निधी दिलेला नाही. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्यावर रविवार २६ नोव्हेंबर पर्यत निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व विभागांची विकासांची कामे, सोमवार २७ नोव्हेंबर पासून बंद करण्यात येईल तसेच संबधित काम करीत असलेल्या साईट वर शासन सदर अडचणी सोडवत नाही म्हणून जनतेसाठी त्यांची अवहेलना होऊ नये यासाठी माफी नामाचा बोर्ड संबधित कंत्राटदार, विकासक सदर कामांच्यास्थळी लावणार आहे.