अन्यथा प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल, आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:58 PM2018-12-24T16:58:29+5:302018-12-24T17:00:43+5:30
पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व पक्षीयांना एकत्र येण्याची गरज आहे. तर ठाणे महापालिकेने मोठे प्रकल्प आधी बाजूला सारून शाई धरणासाठी निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ठाणे - डिसेंबरमध्येच ठाणे शहरात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. येत्या सहा महिन्यात ही परिस्थिती आणखी वाईट होणार आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत लक्षवेधीला उत्तर देतांना शाई धरणावर शिक्कामोर्तब करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. परंतु या बाबतचा निर्णय झाला नाही तर प्रत्येक महासभेला पाण्यासंदर्भात आंदोलन पेटले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या ठाण्यासह जिल्ह्यात पाण्याची समस्या भीषण रुप धारण करीत आहे. डिसेंबर महिन्यातच ३० टक्के पाणी कपात सुरु झाली आहे. ३० तासांसाठी पाणी गेल्यानंतर पुन्हा पाणी चढण्यासाठी २४ तासांचा कालावधी जातो. त्यामुळे एक दिवसाचे शटडाऊन घेतले जात असले तरी त्याचे परिणाम पुढील दोन ते दिवस नागरीकांना भेडसावत असल्याचेही त्यांनी सांगितले. घोडबंदर सारख्या भागातही पाण्याची समस्या वाढत आहे, परंतु असे असतांना न्यायालयात ठाणे महापालिकेने दोन अॅफीडेव्हीट सादर केले. त्यातही ते दिशाभुल करणारे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पालिका प्रशासनाने न्यायालयाचीही दिशाभुल केली असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे.
मागील कित्येक वर्षापासून पाण्याची ही समस्या सोडविण्यासाठी शाई धरणाची मागणी करण्यात आली आहे. सुरवातीला याचा खर्च हा कमी होता. परंतु आता त्याचा खर्च सुमारे १४०० कोटींच्या घरात गेला आहे. असे असेल तरी वेळीच या धरणाचे काम सुरु केले असते तर आज ही परिस्थिती प्रशासनावर आली नसती असेही त्यांनी सांगितले. परंतु आता पाण्याची येत्या काळाची समस्या लक्षात घेता, धरण होणे ही काळाची गरज असून त्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनासुध्दा निवेदन दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. क्लस्टर व्हावे यासाठी ज्या पध्दतीने सर्व पक्षीय एकत्र आले होते, तसेच आता शाई धरणासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दुसरीकडे शाई धरण बांधण्यासाठी पालिकेने इतर मोठ्या प्रकल्पांचा निधी शाई धरणासाठी वर्ग करण्याची मागणीसुध्दा त्यांनी केली आहे. एकूणच येत्या महासभेत लक्षवेधीवर उत्तर देतांना प्रशासन आणि महापौरांनी शाई धरणाची घोषणा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. परंतु ही घोषणा झाली नाही तर मात्र प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.