...अन्यथा आम्ही एसी लोकलमधून प्रवास करू; अंबरनाथ, बदलापुरचे प्रवासी संतप्त
By पंकज पाटील | Published: August 24, 2022 05:58 PM2022-08-24T17:58:46+5:302022-08-24T17:58:55+5:30
रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा आरोप करत अंबरनाथ आणि बदलापूरातील रेल्वे प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला
पंकज पाटील
बदलापूर: गेल्या तीन ते चार दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूरातील रेल्वे प्रवाशांमध्ये एसी लोकलच्या विरोधात संताप वाढला आहे. एसी लोकल रद्द न केल्यास सर्व सामान्य प्रवासी देखील आता साधारण पासवर थेट एसी लोकलमधून प्रवास करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला ताकीद दिली आहे. एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्याने साधारण लोकल गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य प्रवाशांची मागणी ही रेल्वेच्या सर्वसामान्य लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत असताना रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या फेऱ्या वाढविल्याने आता त्याबाबत विरोध होऊ लागला आहे.
साधारण लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल चालवली जात असल्याने रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराबाबत गेल्या दोन दिवसापासून रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईहून अंबरनाथ आणि बदलापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी पाहता एसी लोकल ऐवजी साधारण लोकल या मार्गावर जास्त चालवण्याची गरज आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी मुंबईहून 5 वाजता सुटणारी अंबरनाथ लोकल एसी केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना 05.22 ची बदलापूर लोकल हीच आधार झाली होती.
मात्र गेल्या आठवड्यात 05.22 ची बदलापूर लोकल हीदेखील एसी लोकल केल्याने आता तब्बल एक तास मुंबईहून एकही अंबरनाथ आणि बदलापूर लोकल शिल्लक राहिली नाही. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर प्रवाशांची गर्दी ही 5.33 च्या खोपोली लोकल मध्ये वाढली आहे. अंबरनाथ बदलापूर कर्जत आणि खोपोली या सर्वच प्रवाशांना एक तासाच्या अंतरात एकही लोकल नसल्याने प्रत्येक जण 05:33 खोपोली लोकलवर अवलंबून राहिले आहेत. या ट्रेनला होणारी गर्दी पाहता गेल्या तीन दिवसांपासून प्रवासी बदलापूर स्थानकात उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अजूनही रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात आता अंबरनाथ आणि बदलापूरातील रेल्वे प्रवाशांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला असून एसी लोकल रद्द न केल्यास सर्व सामान्य प्रवासी देखील त्याच लोकलमधून प्रवास करतील अशी ठाम भूमिका घेतली आहे. प्रवाशांच्या या इशाऱ्यानंतर आता रेल्वे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरले आहे