आमचा श्वास... आमचा ध्यास... शरद पवार!, ठाण्यातील कार्यकर्त्यांचा संघर्ष करण्याचा निर्धार! 

By अजित मांडके | Published: February 7, 2024 03:40 PM2024-02-07T15:40:16+5:302024-02-07T15:40:33+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Our breath... our obsession... Sharad Pawar, Sharad Pawar!, Thane activists are determined to fight! | आमचा श्वास... आमचा ध्यास... शरद पवार!, ठाण्यातील कार्यकर्त्यांचा संघर्ष करण्याचा निर्धार! 

आमचा श्वास... आमचा ध्यास... शरद पवार!, ठाण्यातील कार्यकर्त्यांचा संघर्ष करण्याचा निर्धार! 

ठाणे : शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच शरद पवार यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.आमचा श्वास... आमचा ध्यास... शरद पवार, शरद पवार; आमचा पक्ष, आमचे चिन्ह .. शरद पवार अशा घोषणा देत; आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार कार्यकर्त्याकडून व्यक्त करण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी पक्ष कार्यालयात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील,  महिलाध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर,  विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या कार्यकर्त्यांनी हाताला तसेच डोक्याला काळ्या फिती बांधल्या होत्या. तसेच, शरद पवार यांचे छायाचित्र हातात घेऊन, "आमचा पक्ष.. शरद पवार; आमचे चिन्ह.. शरद पवार; जो नाही झाला काकांचा.. तो काय होणार लोकांचा;   देशाचा बुलंद आवाज.. शरद पवार" अशा घोषणा दिल्या. 

या प्रसंगी सुहास देसाई यांनी, जरी आमचा पक्ष चोरला असला तरी पक्षाचा जन्मदाता आमच्यासोबत आहे. त्यामुळे आम्हाला भय नाही तर आमचे बळ अधिकच वाढले आहे. जनतेला सर्व समजत आहे. जनताच या पक्ष चोरणाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल," असे सांगितले. सुजाता घाग यांनी, "आपल्या काकाला दगा देणार्‍यांना जनता माफ करणार नाही. सामान्य महिलांनाही आता अजित पवार आणि त्यांच्या गटाचे धोरण समजले आहे. अदृश्य शक्तीच्या जोरावर टाकलेला हा दरोडा असून त्याचा बदला जनताच घेईल", असे सांगितले. 

विक्रम खामकर यांनी सांगितले की, " शरद पवार ही महाराष्ट्राची ऊर्जा आहे. आतापर्यंत दोन वेळा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्येक वेळेस त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेतली आहे. तिसऱ्या वेळेस तर ते अशी भरारी घेतील की पक्ष चोरणाऱ्यांना चांगलीच जरब बसणार आहे. शरद पवारांवर प्रेम करणाऱ्यांसाठी पक्ष आणि चिन्ह हेच शरद पवार आहेत. त्यामुळे जे लोक काल जल्लोष करीत होते. ते उद्या आपल्या अस्तित्वासाठी झगडतील. यावेळेस मंदार केणी,सचिन पंधारे,दिपक क्षेत्रीय, कुलविंदर सिंग सोखी, आदी स्री- पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Our breath... our obsession... Sharad Pawar, Sharad Pawar!, Thane activists are determined to fight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.