दुष्काळमुक्तीसाठी आमचाही खारीचा वाटा, ठाणे जिल्ह्यातील तरुणांचे श्रमदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:04 AM2019-05-06T01:04:33+5:302019-05-06T01:05:16+5:30
राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली - राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते. त्याच उद्देशाने पाणी फाउंडेशनचे महाराष्टÑात काम सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील तरुणांनी ‘आर्यन ग्रुप’ या नावाने महाराष्टÑ दिनी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील खांडवी गावात श्रमदान करून ओढ्यामध्ये दोन बंधारे बांधून दुष्काळमुक्तीसाठी खारीचा वाटा उचलला. नोकरी सांभाळून हे तरुण ही सामाजिक बांधीलकी जपत आहेत.
महाराष्टÑाची अनेक गावे दरवर्षीच दुष्काळाचे चटके सोसत आहेत. पाण्यावाचून होणारी त्यांची होरपळ दूर करण्यासाठी पाणी फाउंडेशनने लोकचळवळ उभी केली. तीन वर्षांपासून हा तरुणांचा गु्रप ‘आॅक्सिजन + पाणी’ हा उपक्रम राबवत आहे. काही गावांत त्यांना ग्रामस्थांकडून फारसे सहकार्य न मिळाल्याचा अनुभवही आला. मात्र, तरीही त्या-त्या गावातील तरुणांना घेऊ न ते हे काम करत आहेत.
या वर्षी या ग्रुपने खांडवी गावाची निवड केली. त्यासाठी ३० एप्रिलला ही तरुण मंडळी लातूर एक्स्प्रेसने सोलापूर जिल्ह्यातील बारशी तालुक्यातील या गावात पोहचली. १ मे रोजी खांडवी गावात चहा-नास्ता करून ६.३० वाजता गावातील नियोजित जलसंधारण कामाकडे ही टीम वळली. तीन तास श्रमदान करून गावातील ओढ्यात या ग्रुपने दोन बंधारे बांधण्यास मदत केली. या कामात गावातील महिलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. दैनंदिन कामाशी सांगड घालणारी गाणी गात त्या जलसंधारणाचे काम करत होत्या. त्यामुळे इतरांनाही कामाचा हुरूप येत होता. श्रमदानाच्या ठिकाणी नाश्ता झाल्यानंतर आर्यन ग्रुप या कामाला शुभेच्छा देत पुढच्या प्रवासाला निघाला. त्यानंतर या ग्रुपने गोडसेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. शाळेतील मुलांनी गाणी व नृत्य सादर करून मनोरंजन केले. या मुलांना दप्तराचे वाटप, तसेच शाळेला क्रीडा साहित्य, प्रथमोपचार पेटी आणि चांगल्या सवयींचा तक्ता देण्यात आला.
नोकरी सांभाळून सामाजिक बांधिलकी
कल्याण, डोेंबिवली, बदलापूर येथील तरुणांनी एकत्र येऊन आर्यन गु्रप तयार केला आहे. चार ते पाच सदस्यांसह सुरुवात झालेल्या ग्रुपच्या सदस्यांची संख्या ३० वर पोहचली आहे. अनेक सदस्य हे नोकरी करतात. त्यामुळे सुटीचा प्रश्न असल्याने त्यांना पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात फार योगदान देता येत नाही. त्यामुळे १ मे रोजी आम्ही त्यात सहभागी होतो आणि गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी खारीचा वाटा उचलत असल्याचे ग्रुपचे सदस्य गेणू कांबळे यांनी सांगितले.