‘आमचे मित्र म्हस्के आता महापालिकेत दिसणार नाहीत’, भाजपने लावलेला बॅनर चोवीस तासांत केला गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 11:57 AM2024-06-07T11:57:07+5:302024-06-07T11:57:32+5:30

शहरात इतर ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढलेले नसताना नेमका हाच बॅनर कोणी काढला, याची चर्चा सुरू झाली आहे. 

'Our friends Mhaske will not be seen in the municipal corporation', the banner put up by the BJP disappeared within 24 hours. | ‘आमचे मित्र म्हस्के आता महापालिकेत दिसणार नाहीत’, भाजपने लावलेला बॅनर चोवीस तासांत केला गायब

‘आमचे मित्र म्हस्के आता महापालिकेत दिसणार नाहीत’, भाजपने लावलेला बॅनर चोवीस तासांत केला गायब

ठाणे : लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे नरेश म्हस्के विजयी झाल्यानंतर महापालिका मुख्यालयाजवळ ‘आमचे मित्र आता दिसणार नाहीत ठाणे महापालिकेत. ते आता बसणार थेट संसदेत. ठाण्याचा उंबरठा ओलांडण्यासाठी त्यांना शुभेच्छा’, असा बॅनर भाजप व मित्रपक्षांनी लावला. या बॅनरचा अर्थ म्हस्के आता ठाणे महापालिकेत लक्ष देऊ नका दिल्लीकडे लक्ष द्या, असा आहे. बुधवारी सायंकाळी लावण्यात आलेला हा बॅनर अवघ्या २४ तासांत काढण्यात आला. शहरात इतर ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढलेले नसताना नेमका हाच बॅनर कोणी काढला, याची चर्चा सुरू झाली आहे. 

ठाण्याच्या विविध भागात म्हस्के यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकू लागले आहेत. खा. म्हस्के यांनी विजयानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांचे आभार मानले. त्यासाठी त्यांनी केलेल्या पोस्टचीही सर्वत्र चर्चा होत आहे. ‘एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता ‘खासदार’ झाला. हा आहे नवा ‘हिंदुस्तान’, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली, असेही त्यांनी म्हटले.

राजन विचारे यांच्या बॅनरचीही चर्चा 
राजन विचारे यांचा चंदनवाडी शाखेजवळ एक बॅनर झळकला आहे, त्यात ‘गड आला पण सिंह गेला’ असे म्हटले आहे. या बॅनरचीही चर्चा सुरू आहे. परंतु महापालिका मुख्यालयाजवळ लागलेल्या बॅनरवरून वेगळ्याच चर्चांना उधाण आले. म्हस्के विजयी झाल्याबद्दल लावण्यात आलेल्या या बॅनरवर भाजप आणि शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांचे फोटो होते. लोकसभा निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हस्के यांना आता महापालिकेकडे नव्हे दिल्लीकडे लक्ष द्या, असा सल्ला दिला होता. 

Web Title: 'Our friends Mhaske will not be seen in the municipal corporation', the banner put up by the BJP disappeared within 24 hours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.