‘कोरोना रुग्णांच्या मदतीला धावणे हेच होते आमचे ध्येय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 11:39 PM2021-03-07T23:39:28+5:302021-03-07T23:39:46+5:30

यशस्वीरीत्या पार पाडली जबाबदारी

‘Our goal was to help corona patients’ | ‘कोरोना रुग्णांच्या मदतीला धावणे हेच होते आमचे ध्येय’

‘कोरोना रुग्णांच्या मदतीला धावणे हेच होते आमचे ध्येय’

Next

सदानंद नाईक

उल्हासनगर : उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून कोरोनाचे काम निष्ठापूर्वक करणाऱ्या महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिता सपकाळे यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महापालिका आरोग्य केंद्र क्रं-४ च्या प्रमुख असलेल्या डॉ. सपकाळे यांच्यावर कोरोनाकाळात समन्वय तसेच काहीकाळ महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तर आता शहर कोरोना लसीकरणाच्या प्रमुख नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, तत्कालीन आयुक्तांनी कॅम्प नं-४ येथील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच कामगार हॉस्पिटल, आयटीआय कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, नवीन तहसील इमारत, रेडक्रॉस रुग्णालय, वेदांत कॉलेज आदी ठिकाणी कोरोना आरोग्य सेंटर सुरू केले. या सर्वांच्या समन्वयकाची जबाबदारी पार पाडून सम्राट अशोकनगर, आनंदनगर, फॉरवर्ड परिसरात कोरोनाचा स्फोट झाल्यावर परिसर कोरोना शून्य करण्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. पती पुण्याला नोकरीला असून कोरोना काळात १२ वर्षांच्या एकुलत्या एक मुलीला सोबत ठेवल्याचे ते सांगतात.

महापालिकेच्या आरोग्य केंद्र क्र-४ च्या परिचारिका पौर्णिमा खरात यांना लग्नाच्या १५ वर्षांनंतर मुलगी झाली. त्याच दरम्यान जीवघेणी कोरोनाची लाट पसरली. शहरात दिवसाला ३०० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण मिळत असल्याने शहरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले. पती अभियंता असल्याने, त्यांच्या ऑफिसचे काम घरातून चालत होते. याकाळात १३ महिन्यांच्या मुलीची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे उचलली. कोरोना काळातील सात महिन्यांपेक्षा जास्त काळ मुलीला जवळ घेता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलीला आपल्यापासून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती होती. मुलीला काही झाले नसलेतरी पतीला कोरोनाची लागण झाल्याने, १३ महिन्यांच्या मुलीला आईकडे ठेवले. तर होम क्वारंटाइन झाल्यावर त्यांची जबाबदारी स्वतःकडे आली. दरम्यान, आईला ताप आल्यावर मुलीची जबाबदारी पतीने घेतली, असे त्या म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या घरोघरी जाऊन  उपचार करावे लागत होते. त्यावेळी भीती वाटायची, पण रुग्ण बरा होणे हेच एकमेव ध्येय होते.

कोरोनाकाळातील ‘ती’ची ग्रामसेवा वाखाणण्याजोगी

ठाणे : शहापूर तालुक्यातील दळखण गावात ग्रामसेवक पदावर कार्यरत असणाऱ्या माधवी कदम यांचा प्रशासकीय प्रवास आणि कोरोनाकाळात त्यांनी गावाची खऱ्या अर्थाने केलेली सेवा वाखाणण्यासारखी आहे.     

लग्नानंतर २०१२ साली त्या ठाण्यात आल्या. कल्याणच्या नडगाव ग्रामपंचायतीत  कामाची संधी मिळाली. २०१९ साली बदली होऊन त्या दळखण गावात ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्या. उत्तम कामे केले. मात्र, खरी परीक्षा होती ती कोरोनाकाळात. या गावातही सुरुवातीला रुग्णसंख्या वाढत होती आणि मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्याही ५० टक्के होती. अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह त्या अग्रस्थानी होत्या. गावातील बांधव उपाशी राहू नये यासाठी दात्यांच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा करण्याकडेही त्यांचे लक्ष होते. गरोदर महिला व वयोवृद्ध मंडळी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरत होते. प्राथमिक उपचाराकरिता हॉस्पिटल व ॲम्ब्युलन्सची सेवा चालू करण्यात त्या पुढे होत्या. घरी माझी सहा वर्षांची मुलगी आहे, त्यामुळे या काळात काम करताना थोडी काळजी वाटत होती; पण गावातील जनतेचे हित प्रथम लक्षात घेत मी काम केले. माझ्या कुटुंबियांच्या सहकार्याशिवाय हे काम करणे शक्य नाही’, असे त्या म्हणाल्या.

Web Title: ‘Our goal was to help corona patients’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.