आमचे सरकार हप्ता भरणारं आहे तर पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्र्यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 05:17 PM2024-08-15T17:17:04+5:302024-08-15T17:17:20+5:30
महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
पंकज पाटील/ बदलापूर: "गेल्या दोन वर्षात आमच्या सरकारने लोकांच्या हितासाठी अनेक कामे केली. पूर्वीचे सरकार हे हप्ता घेणारे सरकार होतं आणि आमचं सरकार हे महिला, शेतकरी आणि बेरोजगार यांच्या बँक खात्यात हप्ता भरणारं सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे," असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आलं होते. उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच हे सरकार फसवे नसून लोकांसाठी काम करणारे सरकार असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून या महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी गेल्या दोन वर्षात अनेक प्रकल्प राबवल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरताना महिलांचे बँक अकाउंट लिंक झालेत की नाही हे चेक करण्यासाठी सरकार सुरुवातीला एक रुपया टाकणार होते, मात्र विरोधक या एक रुपयाचेही राजकारण करतील म्हणून आम्ही पूर्ण रक्कम आमच्या भगिनींच्या बँक खात्यात टाकल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विरोधकांना प्रत्येक योजनेमध्ये केवळ राजकारण दिसत असून आम्ही जनतेच्या समाधानासाठी काम करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आमदार किसन कथोरे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि राजकीय पुढारी उपस्थित होते.