आमचा केडीएमसीवर भरोसाच राहिला नाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:59 AM2017-09-04T02:59:54+5:302017-09-04T03:00:32+5:30
कल्याण म्हटले की आपल्यापुढे बकालपणाचेच चित्र उभे राहते. स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, चालण्यासाठी जागाच नाही, फेरीवाल्यांचे अतिक्रमण हे कल्याण पश्चिमेत दिसते. पण तेथे तुलनेने बरी स्थिती आहे
- प्रशांत माने
कल्याण म्हटले की आपल्यापुढे बकालपणाचेच चित्र उभे राहते. स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, चालण्यासाठी जागाच नाही, फेरीवाल्यांचे अतिक्रमण हे कल्याण पश्चिमेत दिसते. पण तेथे तुलनेने बरी स्थिती आहे, असे म्हणावे लागले इतकी बिकट परिस्थिती पूर्वेत आहे. तेथे पालिकेचा विकास पोचायलाच तयार नाही. त्यामुळे मूलभूत समस्या तेथील नागरिकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. म्हणूनच कल्याण पूर्व असुविधांचे जंक्शन म्हणून ओळखले जाते.
कल्याण- डोंबिवली शहरांची स्मार्ट सिटी प्रक्रियेत निवड झाली असली तरी केडीएमसी क्षेत्राचा भाग असलेले कल्याण पश्चिम आणि डोंबिवली वगळता कल्याण पूर्व हा महापालिकेत समाविष्ट असलेला भाग मागील तीन ते चार दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेपासून दूर राहिलेला आहे. या भागातून महापौर, सभापती, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार निवडून जाऊनही या भागाचा म्हणावा तसा अद्यापही विकास झालेला नाही. वेगवेगळया स्तरावर यासंदर्भात चर्चा होऊनही या भागाची सुधारणा होण्याची चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे केडीएमसीतील हा भाग स्मार्ट सिटीच्या प्रक्रियेत सोडाच, पण पायाभूत, मूलभूत सुविधांच्या पातळीवर तरी सक्षमपणे कधी उभा राहील? हा प्रश्न असल्याने कल्याण पूर्व सध्या तरी संपूर्णपणे ‘असुविधांचे जंक्शन’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
१ नोव्हेंबर १८५५ मध्ये कल्याण नगरपालिका स्थापन झाली तर कल्याण डोंबिवली महापालिकेची स्थापना १९८३ मध्ये झाली. मुंबई जवळचा नागरी समूह म्हणून झपाटयाने विकसित झालेल्या या भागात वाढत्या गरजांप्रमाणे नियोजन करण्यात स्थानिक स्वराज्य संस्था असलेली केडीएमसी पुरती अपयशी ठरल्याचे चित्र आहे. याची सर्वात जास्त झळ कल्याण पूर्वेकडील भागाला बसल्याचे आपल्याला ठिकठिकाणी जाणवते. कल्याण पश्चिमेला जशी ऐतिहासिक परंपरा आहे त्या तुलनेत कल्याण पूर्वेला इतिहास नाही. पूर्वीच्या कल्याण विधानसभा मतदारसंघाचे चार भाग झाले. यात कल्याण पूर्व हा वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आला. तर महापालिकेचा ‘ड’ प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाºया प्रभागाचेही तीन प्रभाग झाले. यात ‘ड’ प्रभागा व्यतिरीक्त ‘जे’ आणि ‘आय’ प्रभागाची भर पडली. ‘ड’ प्रभाग जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा प्रभागांची संख्या २५ होती. आजच्याघडीला नव्या प्रभाग रचनेनुसार तसेच २७ गावांचा केडीएमसीत समावेश झाल्यानंतरही प्रभागांची संख्या ३४ च्या आसपास पोहचली आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघाचा आढावा घेता याची हद्द अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग नेवाळी नाका या परिसरातील काही गावांसह उल्हासनगरमधील पाच प्रभाग या मतदारसंघात मोडतात. केडीएमसीतील लोकप्रतिनिधींची राजवट पाहता १९९५ ला ती अस्तित्वात आली. काँग्रेस-राष्ट्रवादीचा अडीच वर्षाचा कालावधी वगळता सर्वाधिक सत्ता शिवसेना-भाजपा युतीची या महापालिकेत राहिली आहे. सध्याही महापालिकेत त्यांचीच सत्ता असली तरी एकंदरीतच लोकप्रतिनिधींच्या आतापर्यंतच्या २२ वर्षाच्या कालावधीत कल्याण पूर्व भागाला नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळालेली आहे.
२०११ च्या जनगणेनुसार या भागातील लोकसंख्या २ लाख ९६ हजार असल्याची नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात ही संख्या ४ ते ५ लाखांच्या आसपास असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन दशकात हा पूर्वेकडील भाग आडवा-तिडवा वाढत गेला. नियोजनाअभावी हा भाग अद्यापही वाढत असल्याने या भागाला एकप्रकारे बकाल स्वरूप आले आहे. बहुतांश चाळींचा भाग असलेल्या या परिसरात बेसुमार वाढलेली बेकायदा बांधकामे, परिणामी लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे, सदोष पाणी व्यवस्था आणि वितरणातील असमानता यामुळे सातत्याने पाण्याची जाणवणारी कमतरता, अतिक्रमणे, पावसाळयात तुंबणारे गटार, नाले, ड्रेनेज सुविधा योग्य नसणे, नादुरूस्त आणि अरूंद रस्ते, विकास प्रकल्पांची अपूर्ण कामे, मनोरंजन केंद्रांचा अभाव, मैदानांची कमतरता, वैद्यकीय सुविधा नसणे, ग्रंथालयाची वानवा, तलावांचे अस्तित्व धोक्यात, डंम्पिग नसल्याने जागोजागी कचºयाचे ढीग असे काहीसे वर्णन कल्याण पूर्वेचे करणे वास्तव पाहता उचित ठरेल. आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे आणि मोक्याच्या जागा गिळंकृत केल्याने येथील ‘विकासकामांचे’ चांगभलं झाल्याचे पाहयला मिळते. केडीएमसीकडे स्वत:ची पाणीपुरवठा योजना असताना तसेच २४ बाय ७ असा पाणीपुरवठा करण्याचा ध्यास घेतला गेलेला असताना पूर्वेकडील भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य काही भागांमध्ये अद्यापही कमालीचे जाणवते. २०१० ते २०१५ या कालावधीत या भागातील पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला होता. याउपरही आजही काही प्रभागांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पूर्वेत वाहनतळ नसल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी करायची कुठे? असा प्रश्न नेहमीच चालकांना पडतो. परिणामी रस्त्याच्या आजूबाजूला वाहने हवीतशी उभी केली जात असल्याने याचा फटका वाहतुकीला बसून ‘कोंडी’ ची समस्या उदभवते. हे चित्र प्रामुख्याने रेल्वेस्थानक परिसर आणि महत्वाच्या चौकांमध्ये दिसून येते. कोंडीवर उपाय म्हणून बांधण्यात आलेले स्कायवॉक तसेच उड्डाणपूल हे मात्र एकप्रकारे निरूपयोगी ठरले आहेत. बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांची देखभाल दुरूस्ती योग्य प्रकारे होत नसल्याने आजमितीला कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाºया वालधुनी पुलासह विठ्ठलवाडी तलावाशेजारील वालधुनी एफ केबीन आणि पूना-लिंक रोडवरील लोकगायक प्रल्हाद शिंदे उड्डाणपुलावर मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पूना-लिंक रोड वगळता पूर्वेकडील बहुतांश अंतर्गत रस्ते हे अरूंद असल्याने अग्निशमन दलाची गाडीही जाऊ शकत नाही.