आमच्या मनसेच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:02 AM2018-05-04T02:02:47+5:302018-05-04T02:02:47+5:30
आमच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी शहराध्यक्ष बाळा गुंजाळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला दिल्याने
सदानंद नाईक
उल्हासनगर : आमच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी शहराध्यक्ष बाळा गुंजाळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला दिल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. याच वादाचे पर्यवसान पोस्टरयुद्धात झाले असून नवीन कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांसह शहराध्यक्षांचा फोटो पोस्टरवरून गायब झाला आहे. राज यांनी शिवसेना सोडली तेव्हा आपल्या विठ्ठलास (बाळासाहेब ठाकरे) यांना बडव्यांनी घेरल्याची टीका केली होती. आज तीच टीका त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर केली जात आहे.
उल्हासनगरात मनसेची पायाभरणी अॅड. संभाजी पाटील यांच्यासह एल.बी. पाटील, बाळा गुंजाळ, शालिग्राम सोनावणे यांनी केली. पक्षाचा पहिला नगरसेवक शहरातून निवडून आला होता. पाटील यांच्या निधनानंतर मनसेला घरघर लागली. तरीही सचिन कदम, प्रदीप गोडसे, बंडू देशमुख, कल्पेश माने, मैनुद्दीन शेख, मनोज शेलार, कामगार नेते दिलीप थोरात आदी स्थानिक नेते व पदाधिकाºयांनी मनसेच्या कुडीत धुगधुग ठेवली होती. विरोधी पक्षाची भूमिका वठवत होते. मात्र, गेल्या महिन्यात शहराध्यक्षपदाच्या निवडीनंतर पक्षात असंतोष निर्माण झाला. बंडू देशमुख यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मनसेतील वाद उफाळून आले. राजू पाटील, काका मांडले यांच्यासह इतर जिल्हास्तरीय नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानांवर ही परिस्थिती घातल्यानंतर सचिन कदम यांची उल्हासनगर-अंबरनाथच्या शहरजिल्हाध्यक्षपदी तर प्रदीप गोडसे यांची उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र, काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. माजी शहराध्यक्ष बाळा गुंजाळ यांनी तर थेट आमच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरल्याची प्रतिक्रिया दिली. पक्षाचे माजी शहराध्यक्ष संजय घुगे, मैनुद्दीन शेख यांच्यासह अन्य काही जणांनीही नाराजी व्यक्त केली.
राज यांनी पालघरमधील सभेपासून आपला राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. मात्र अनेक शहरांतील संघटनेकडे या अगोदर दुर्लक्ष झाल्याने असे नाराजीचे सूर उमटत आहेत.