उपचार आमचे, औषधे बाहेरची; रुक्मिणीबाई रुग्णालयात पिळवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:47 AM2019-01-28T00:47:14+5:302019-01-28T00:47:34+5:30
दोन डॉक्टरांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस
कल्याण : एकीकडे डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णालयांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच कार्यरत असलेल्या काही डॉक्टरांकडून ‘उपचार आमचे, पण औषधे बाहेरून खरेदी करा’ अशी काहीशी कार्यपद्धती केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अवलंबत आहेत. या अनागोंदी कारभाराबाबत तक्रार मिळाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने डॉ. सतीश गेडाम आणि डॉ. हेमंत राऊत यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे.
केडीएमसीची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर अशी दोन मोठी रुग्णालये आहेत. या रु ग्णालयातील बाह्य रुग्ण विभागामध्ये प्रतिदिन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा आढावा घेता याठिकाणी ८०० हून अधिक रुग्ण येतात. या रुग्णालयांमध्ये सर्वसाधारणपणे गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. दरम्यान, मुबलक प्रमाणात औषधांचा साठा असल्याचा दावा प्रशासन नेहमीच करत असताना रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णांना बाहेरच्या औषधाच्या दुकानांतून औषधे आणण्यास सांगितले जात आहे. याबाबत शिवसेनेचे कल्याण महानगरप्रमुख विजय साळवी यांनी मुद्दा उपस्थित करीत रुक्मिणीबाई रुग्णालयात हा प्रकार सर्रास चालतो याकडे लक्ष वेधले होते. साळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर विनीता राणे यांच्या घेतलेल्या भेटीत चौकशी करून बाहेरून महागडी औषधे खरेदी करण्यास सांगून रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाºया संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजू लवंगारे, रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील याही उपस्थित होत्या. याप्रकरणी आठ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई केली, असे आश्वासन पगार आणि महापौर राणे यांनी शिष्टमंडळाला दिले होते. कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन छेडले, असा इशारा साळवी यांनी दिला होता. दरम्यान, साळवी यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत गेडाम आणि राऊत या दोन डॉक्टरांची नावे समोर आली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आला आहे.
हस्ताक्षरावरून अनागोंदी चव्हाट्यावर
शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून तक्रारीबरोबरच काही पुरावेही प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यामुळे या पुराव्यांच्या आधारे काय कारवाई होते याकडे लक्ष लागले होते.
१५ प्रिस्क्रिप्शन पेपर पैकी १३ प्रिस्क्रिप्शनवर डॉ. सतीश गेडाम तर दोन प्रिस्क्रिप्शनवर डॉ. हेमंत राऊत यांचे हस्ताक्षरआढळल्याचे चौकशीत समोर आले आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजू लवंगारे यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना पाठविलेल्या अहवालात नमूद केले आहे.