अवर व्होट नॉट फॉर सेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:23 AM2017-07-18T02:23:46+5:302017-07-18T02:23:46+5:30

मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकारण्यांनी जरी साम, दाम, भेद असा मार्गांचा वापर सुरू केला असला;तरी काही कॉलेज तरूणांनी मात्र नागरिकांना

Our vote not for sale! | अवर व्होट नॉट फॉर सेल!

अवर व्होट नॉट फॉर सेल!

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकारण्यांनी जरी साम, दाम, भेद असा मार्गांचा वापर सुरू केला असला;तरी काही कॉलेज तरूणांनी मात्र नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतानाच ‘अवर व्होट नोट फॉर सेल’ अशी जनजागृतीपर मोहीम हाती घेतली आहे.
मतदारांनी मतदानाचा हक्क तर बजावावा; पण त्याचबरोबर आपले मत विकण्यासाठी नाही, याचे भानही राखावे, यासाठी मीरा-भार्इंदरमधील महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी जनजागृती सुरु केली आहे.
सत्यकाम फौऊंडेशनचे कृष्णा गुप्ता, एझिकल बास्कर, वामा गौर आदींसह १५ विद्यार्थ्यांनी ‘अवर व्होट नॉट फॉर सेल’ या नावाने ही जनजागृती सुरु केली आहे. या विद्यार्थ्यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करुन जनजागृतीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
निवडणुकीत पैसा, पार्ट्या व जाती-धर्माच्या आधारे सर्रास मतदान होत असल्याने असे मतदान वाया जाते. त्यामुळे लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व मत विक्रीसाठी नाही, अशा प्रचाराची सुरवात विद्यार्थ्यांनी केल्याचे कृष्णा गुप्ता यांनी सांगितले. आम्ही सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करणार आहोत. दोन ते तीन मिनिटांची व्हिडीयो क्लिप तयार करत आहोत. फलकांद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मतदानाचा हक्क आवर्जून बजावला पाहिजेच. पण मतदान करताना जात-धर्म- प्रांत पाहू नका. उमेदवाराचे चारित्र्य पहा. उमेदवार वा राजकारणी किती खर्च करतोय, पैसे वाटतोय, कामे करुन देतोय किंवा पार्ट्या देतोय याकडे लक्ष देऊ नका. उलट अशांना अजिबात मतदान करु नका. कारण निवडणुकीत लाखो रुपये खर्च केल्यानंतर त्याच्या दहापट पैसे वसूल करण्याचे काम हे लोकप्रतिनिधी पुढील पाच वर्षात करतात, असे एझिकल बास्कर या विद्यार्थ्यांने सांगितले. जनजागृतीसाठी आम्ही महापालिकेलाही सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तसे आश्वासन त्यांनी दिले आहे. पण पालिकेने मदत केली नाही, तरी आम्ही विद्यार्थी स्वत:च्या खिशातून किंवा लोकवर्गणीतून ही जनजागृती मोहीम राबवणार आहोत, असे वामा गौर ही विद्यार्थिनी म्हणाली.
विद्यार्थ्यांच्या या जनजागृती मोहीमेला शहरातील सुशिक्षत व जागरुक मतदार, राजकीय पक्ष आणि उमेदवार कसा प्रतिसाद देतात, हे लवकरच समजेल.

मते मिळवण्याचा धंदा!
आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिलेली असली, तरी त्यापेक्षा कितीतरी पट अधिक खर्च होत असतो. पूर्वी पक्ष कार्यकर्ते चहा-वडापाववर स्वत:हून उमेदवारांच्या प्रचाराचे काम करत. आता मात्र कंत्राटी कार्यकर्त्यांना चहा, नाष्टा, जेवण, प्रचारफेरीचे पैसे, पुन्हा रात्रीची ओली पार्टी द्यावी लागते. रोजंदारीवरील महिला, तरुण व पुरुष कार्यकर्त्यांना दररोज किमान चारशे ते हजार रूपये द्यावे लागतात.
इमारती, चाळी, झोपडपट्ट्यांतील प्रमुखांना तर निवडणुकीत मोठे महत्व प्राप्त होते. त्याचबरोबर विशिष्ट धर्म, जाती, समाज, प्रांत, भाषा, काही ठिकाणी धार्मिक प्रमुखांनाही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जातो. त्यासाठी ठराविक रक्कम दिली जाते. जेवणावळी तसेच सहली काढल जातात. एकगठ्ठा मतदारांना ओल्या पार्ट्याही दिल्या जातात. शिवाय एकेका मतासाठी पाचशे रूपयांपासून पाच हजारांचा भाव दिला जातो.
मतांसाठी काही महिने केबल फुकट, इमारती - चाळींमध्ये रंगरंगोटी, टाईल्स-लाद्या बसवून देणे, पत्र्याचे छप्पर बांधून देणे, प्लंबिंगचे काम करुन देणे, सीसीटीव्ही बसवणे, मेन्टेनन्स भरणे, कॉर्पस फंड देणे, टाक्या साफ करून देणे आदी प्रकार सर्रास चालतात. धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या जातात, भंडारे होतात किंवा विविध प्रकारची कामे करुन दिली जातात. मतदारही यानिमित्ताने कामे करून घेत फायदे मिळवतात.

Web Title: Our vote not for sale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.