जिल्ह्यात २४ हजार २२७ पैकी टीईटी पास नसलेले अवघे १२ शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:50+5:302021-06-30T04:25:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण संस्थेच्या कृपाशीर्वादाने ‘टीईटी’ ही परीक्षा उत्तीर्ण नसलेले शिक्षक मिळेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण संस्थेच्या कृपाशीर्वादाने ‘टीईटी’ ही परीक्षा उत्तीर्ण नसलेले शिक्षक मिळेल त्या वेतनावर विद्यार्थी घडवत आहेत. पण आता टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच सेवेत राहता येईल, असे शिक्कामोर्तब औरंगाबाद खंडपीठाने निर्णयाद्वारे केले आहे. यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नोकरी संकटात आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १२ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेले शिक्षक हे संस्थांच्या शाळांमधील आहेत. शासकीय, जिल्हा परिषद, महापालिका शाळांमध्ये आधीच नियमबाह्य शिक्षक भरण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झालेले शिक्षक जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांच्याच शाळांमध्ये आढळून येतात. यानुसार जिल्ह्यातील या टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची संख्या ही १२ आढळून आली आहे. न्यायालयीन आदेशानुसार आता या शिक्षकांवर गंडांतर आले आहे. कायम शिक्षकांच्या तुलनेत कंत्राटी शिक्षकांच्या कामाचा दर्जा उत्तम असल्याचे याआधी राजकीय वर्तुळात ऐकायला मिळायचे. मात्र, आता यातील टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांच्या नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. यावर संबंधित शिक्षण संस्था आता काय हालचाली करणार, याकडे या शिक्षकांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाआनुदानित शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या बघता अवघे १२ शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाकडे नोंदविण्यात आले आहे. ठाणे महापालिकेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या सहा महापालिकांसह जिल्हा परिषदेच्या व नगर परिषदांच्या कार्य क्षेत्रात अनुदानित ४३४ माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांसह अंशत: अनुदानित, विनाअनुदानित आदी एक हजार ६२० शाळा व कनिष्ठ महाविद्यालये जिल्ह्यात कार्यरत आहेत.
या शाळांमध्ये यामध्ये सात हजार ७३७ शिक्षक व १६ हजार ४९० शिक्षिकांसह तब्बल २४ हजार २२७ शिक्षक कार्यरत आहेत. याशिवाय आठ हजार ९१ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हाभरातील या ३२ हजार ३१८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून नववी ते १२वीच्या चार लाख ४२ हजार ५०७ विद्यार्थ्यांना या एक हजार ६२० व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यादानाचे कार्य सध्या सुरू आहे. यात शाळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कमी वेतनावर, वेतन मिळण्याच्या अपेक्षेने बहुतांशी शिक्षक कायम सेवा लागू होईल या आशेने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्याची दखल घेऊन शिक्षण संस्था ठरावाच्या माध्यमातून काही शिक्षकांना सेवेतही घेतले. पण, आता त्यांच्या या नोकरीवर गंडांतर आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
--------
जोड आहे.