ग्रामीण भागांत ७३१ शाळाबाह्य मुले
By admin | Published: April 18, 2017 03:19 AM2017-04-18T03:19:11+5:302017-04-18T03:19:11+5:30
जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागांत नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ७३१ शाळाबाह्य मुले व मुली आढळल्या आहेत.
ठाणे : जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागांत नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ७३१ शाळाबाह्य मुले व मुली आढळल्या आहेत. या बालकांना त्वरित जवळच्या शाळेत दाखल केल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. परंतु, त्यांच्या शाळेत दाखल केल्याच्या दाव्यात विसंगती आढळून येत आहे.
‘शिक्षणाचा हक्क’ या कायद्याखाली एकही मुलगा, मुलगी शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. यामुळे या शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना वेळीच शाळेत दाखल करत असल्याचा दावा होत आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरूप शिक्षण दिले जाणार आहे. त्यावर प्रत्येकी सुमारे तीन हजार वर्षभरात खर्च होणार आहे. यानुसार, या ७३१ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली मनपासह उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी, ठाणे व मीरा-भार्इंदर या सहा महापालिकांमध्ये ६६४ बालके शाळाबाह्य आढळली आहेत. यामध्ये ३३६ मुलांसह ३२८ मुलींचा समावेश आहे. सर्वाधिक नवी मुंबईत २३५, तर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात १५४ बालके आढळली आहेत. विशेष म्हणजे शाळाबाह्य मुले अधिक असण्याची शक्यता असलेल्या उल्हासनगरमध्ये ४२ व भिवंडीत केवळ ४५ बालके आढळली आहे. याशिवाय, ग्रामीणमध्ये ६७ बालके असून त्यात ३० मुले आणि ३७ मुलींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)