नऊपैकी सात प्रभाग समिती महिलांच्या ताब्यात, प्रभाग समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 03:55 PM2019-07-08T15:55:34+5:302019-07-08T15:56:48+5:30
ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपचे मनोमिलन झाले असल्याने प्रभाग समिती अध्यक्ष पदांचा तिडाही सुटला आहे. त्यानुसार सात प्रभाग समितींवर महिलांचा वरचष्मा दिसून आला आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीपैकी तब्बल सात प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाचा मान यंदा महिलांना मिळाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये मनोमिलन झाल्याने सर्वचच्या सर्वच प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडही बिनविरोध झाल्या आहेत. तर शिवसेनेने सर्वाधिक पाच महिलांना अध्यक्षपद दिले असून त्या खोलाखाल भाजप आणि राष्ट्रवादीनेही महिलांना संधी दिल्याचे दिसून आले आहे.
नऊ प्रभाग समितीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सोमवारी या प्रभाग समितीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार उथळसर प्रभाग समितीत दिपा गावंड (भाजपा), कळवा प्रभाग समितीत जितेंद्र पाटील (राष्ट्रवादी), मुंब्रा प्रभाग समिती अशरीन राऊत (राष्ट्रवादी) यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर शिवसेनेकडून नम्रता पमनानी (कोपरी), पज्ञा भगत (माजिवडा - मानपाडा), दिपाली भगत (दिवा), निर्मला कनसे (लोकमान्य - सावरकरनगर), शिल्पा वाघ (वागळे इस्टेट) आणि नरेश सुरकर (वर्तकनगर) आदींसुध्दा बिनविरोध निवड झाली आहे. तर या प्रभाग समितीमध्ये शिवसेनेकडून पाच महिला, राष्ट्रवादी आणि भाजपकडून प्रत्येक एक अशा एकूण सात नगरसेविकांना यंदा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. तर प्रभाग समितींवर पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले असून त्यांच्या वाट्याला सहा, राष्ट्रवादी दोन आणि भाजपच्या वाटेला एक प्रभाग समिती आली आहे.