मोरीवली गावावर शोककळा; आठ भाविक हे एकट्या मोरीवलीचे, संपूर्ण गाव हळहळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 06:23 AM2023-01-14T06:23:04+5:302023-01-14T06:23:11+5:30
मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी धाव घेतली.
- पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथनजीकच्या मोरीवली गावावर शुक्रवारी शोककळा पसरली. १५ बसगाड्यांमधील एका बसला झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्या दहा जणांपैकी आठ भाविक हे एकट्या मोरीवली गावचे असल्यामुळे संपूर्ण गाव हळहळले. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी धाव घेतली. यासोबत राष्ट्रवादीचे शहरप्रमुख सदाशिव पाटील यांनीही नातलगांची भेट घेऊन सांत्वन केले.
चौघा चिमुकल्यांचा जीव थोडक्यात वाचला
अपघातग्रस्त बसमध्ये गौरव दिनकर आणि वैष्णव सासे हे आपल्या इतर दोन मित्रांसह प्रवास करीत होते. ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या केबिनमध्ये चौघांची मस्ती सुरू हाेती. प्रवाशांनी त्यांना उल्हासनगरमध्ये बस थांबवून दुसऱ्या बसमध्ये पाठवले. याचवेळी त्या बसमधून प्रवास करणाऱ्या आणखी एका जोडप्याने बसायला जागा न मिळाल्याने बस बदलली. त्यामुळे या जोडप्यासह चार चिमुकल्यांचा जीव वाचला.
काँग्रेसचे कार्यकर्ते रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी
मोरवली गावातील ग्रामस्थांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच अंबरनाथमधील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील यांनी रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी धाव घेतली. किरकोळ जखमी झालेल्यांना परत आणणे आणि मृतदेह अंबरनाथला आणण्याकरिता त्यांनी रुग्णवाहिकांचा वापर केला.