जिल्ह्यातील ६५० हेक्टर भात पिकावर बगळ्यासह कीड रोगाचा प्रादुर्भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:43 AM2021-08-23T04:43:04+5:302021-08-23T04:43:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात यंदा ६५ हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड करण्यात आली आहे. यातील भात या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात यंदा ६५ हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड करण्यात आली आहे. यातील भात या प्रमुख पिकाची सर्वाधिक लागवड जिल्ह्यात वेळेवर झाली. मात्र, दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे भात पिकावर बगळ्या रोगाचा आणि कीड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्हाभरात ६०० ते ६५० हेक्टर क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
भात पिकावर बगळ्या रोगासह काही ठिकाणी खोड किड्याचा व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पानं गुंडाळणारी अळी पानाच्या कडा गुंडाळून आतील रस शोषून घेते. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात. सुरळीतील अळी पानाच्या टोकाची सुरळी करून रस शोषून घेते. त्यामुळे पाने पांढरी पडत असल्याने या रोगाला शेतकरी बगळ्या रोग म्हणून ओळखतात. या प्रादुर्भावामुळे भात पिकाची वाढ खुंटते. खोड किड्याची अळी भाताच्या खोडात लपून तिथे गाभा पोखरून खाते. यामुळे खोडातून अन्न वर जाऊ शकत नाही. परिणामी, पाने सुकून, सुरळी होऊन लाल पिवळसर पडत आहेत. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरावर देखरेख सुरू केली आहे.
जिल्हाभरात एकूण लागवडीच्या एक टक्का क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या वृत्तास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दुजोरा दिला आहे. कीड नियंत्रित करणारी औषधी ५० टक्के अनुदानाने उपलब्ध करून दिली आहेत. संबंधित शेतकऱ्यांना कृषी साहाय्यकांमार्फत मार्गदर्शन केले जात असल्याचे माने यांनी सांगितले. या रोगावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले.