डेंग्यूसह साथीच्या आजारांनी जिल्ह्यात पाच रुग्ण दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:14+5:302021-07-19T04:25:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यात कोरोनाची दहशत सुरूच असून, आता पावसाळी साथीचा कहरही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यात कोरोनाची दहशत सुरूच असून, आता पावसाळी साथीचा कहरही वाढण्याची शक्यता आहे. डाॅक्टरांनी याचे गांभीर्य ओळखून कोरोनाच्या साथीत जानेवारीपासून जूनपर्यंतच्या डेंग्यू, हिवताप (मलेरिया) आणि चिकनगुनियाच्या साथीने पाच जणांचा मृत्यू झाल्याचे उघड केले. यामुळे जिल्ह्यात संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपाठोपाठ डेंग्यू, मलेरियाचा कहर डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यास आळा घालण्यासाठी वेळीच उपाययोजनांची गरज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूच्या साथीने दोघांचा मृत्यू झालेला आहे. या साथीदरम्यान १७ जणांना या तापाने व सात जणांना दूषित पाण्यामुळे त्रास झाला. भिवंडी महापालिकेसह मुरबाडच्या एका गावात ही साथ जूनपर्यंत अनुभवलेली आहे. हिवतापानेही दोघांचा बळी घेतलेला आहे. ११ जणांना या तापाने फणफणत ठेवून थंडीच्या हुडहुडीने त्रस्त केले आहे. दोघे दूषित पाण्याचे रुग्ण म्हणून नोंद केले आहेत. याशिवाय चिकनगुनियाने एकाचा मृत्यू होऊन ११ जणांवर उपचार झाले. दोन दूषित पाण्याचे रुग्णही आढळले.
सध्या होणारे बहुतांश मृत्यू कोरोनाचे बळी म्हणून सर्रास बोलले जाते आहे. पण त्याकडे लक्ष केंद्रित करून डाॅक्टरांनी साथीच्या आजारांकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या मलेरिया, डेंग्यू या जीवघेण्या साथीच्या आजारासह चिकनगुनियाकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या महिन्यापर्यंत डेंग्यूची साथ हाताळण्यात आलेल्या मुरबाड तालुक्यातील तुळई या ८६४ लोकवस्तीच्या गावात सहा जण डेंग्यूचे आढळल्याने गांभीर्य वाढले आहे. येथील तापाच्या रुग्णांत डेंग्यूचे सात जण आढळले. यात एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रमाणेच भिवंडीच्या पद्मानगरात फेब्रुवारीपर्यंत डेंग्यूच्या साथीवर उपचार झाले. यात एक जण तापाचा रुग्ण आढळून आला. दोन दूषित पाण्याचे रुग्ण सापडले. या ४६० लोकवस्तीच्या पद्मानगरवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
------- पूरक जोड आहे