ठाण्यात साथीचे आजार नियंत्रणात, महापालिकेने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 01:23 AM2020-08-19T01:23:40+5:302020-08-19T01:23:48+5:30
परंतु, यंदा मात्र अद्यापही पावसाने साथ दिल्याने शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण नियंत्रणात असल्याची माहिती पालिकेने दिली.
ठाणे : एकीकडे कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना यंदा ठाणे शहरात विविध साथीच्या आजारांचे प्रमाणही नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले होते. परंतु, यंदा मात्र अद्यापही पावसाने साथ दिल्याने शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण नियंत्रणात असल्याची माहिती पालिकेने दिली.
महापालिका हद्दीत जून-जुलै या कालावधीत डेंग्यूच्या २७ पैकी १० रुग्ण हे संशयित होते, तर मलेरियाचे दोन महिन्यांत २० रुग्ण आढळले आहेत. पावसाळा सुरू झाला की, साथीचे आजारही बळावण्यास सुरुवात होते. यंदा आरोग्ययंत्रणाही कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने शहरात इतर साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष झाले आहे. असे असले तरी महापालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी विविध स्वरूपाचे उपाय केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
>30,997 घरांची
तपासणी
महापालिका हद्दीत १८३० ठिकाणी औषधफवारणी केली आहे. तर, २९,६६३ ठिकाणी धूरफवारणी केल्याचा दावाही केला आहे. यशिवाय, ३० हजार ९९७ घरांची तपासणी केली असता १९९२ घरे दूषित आढळले आहेत. तसेच एकूण ४७,५२१ पाण्याच्या पिंपांच्या तपासणीत ११३८ पिंपे दूषित आढळल्याने त्यामध्ये अळीनाशक औषधफवारणी केली आहे.
>तापाच्या रुग्णांवरही तपासणी करून कोरोनाचे उपचार
मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर लेप्टो, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. दिव्यात तर लेप्टोमुळे काहींचा बळीही गेला होता. यंदा मात्र पावसाने तेवढे रौद्ररूप धारण केलेले नाही. यामुळे इतर साथीचे आजार नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. वास्तविक पाहता, सध्या कोरोनाच्या कामात सर्वच आरोग्य यंत्रणा व्यस्त असल्याने शहरातील इतर साथीच्या आजारांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचेही बोलले जात आहे. साधा ताप असला तरी रुग्णाला इतर रुग्णालयांत तपासले जात नाही. आधी कोरोनाचा अहवाल आणा, मगच उपचार करू,असे त्याला सांगितले जात आहे. त्यामुळे ताप असेल आणि कोरोनातपासणी केली तर अहवाल लगेच पॉझिटिव्ह येत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे संबंधित रुग्णावर थेट कोरोनाचेच उपचार केले जात आहेत. त्यामुळेदेखील इतर साथीच्या आजारांची संख्या ही कमी असल्याचे दिसत आहे.