शालेय साहित्याच्या गोदामाला भीषण आग, डोंबिवली स्थानकाबाहेरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:51 AM2017-08-27T01:51:29+5:302017-08-27T01:51:42+5:30
डोंबिवली पूर्वेला रेल्वेस्थानकालगतच्या वीरा शॉपिंग सेंटर इमारतीच्या तिसºया मजल्यावरील एका शालेय साहित्याच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेला रेल्वेस्थानकालगतच्या वीरा शॉपिंग सेंटर इमारतीच्या तिसºया मजल्यावरील एका शालेय साहित्याच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा गोदामाच्या खिडक्यांमधून बाहेर येत असल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली. शहरातील वाहतूककोंडी, उर्सेकरवाडीतील अरुंद रस्ते व परिसरातील फेरीवाले, यामुळे घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळे आले. अखेरीस साडेचार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
येथील डॉ. राथ रोडवर स्मार्ट रॉमसन हे शालेय गणवेश व साहित्यविक्रीचे दुकान आहे. या दुकानदाराचे वीरा शॉपिंग सेंटर या चार मजली इमारतीच्या तिसºया मजल्यावर गोदाम आहे. त्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी त्यास दुजोरा दिला नाही. या गोदामात शर्ट, पॅण्ट्स, दप्तरे, बूट आदी शालेय साहित्य होते. त्यातील बहुतांशी साहित्य प्लास्टिकचे असल्याने आग गोदामात धुमसत होती. सर्वप्रथम शिव मंदिर रोडवरून उर्सेकरवाडीत अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. त्यानंतर, कल्याण येथून चार गाड्या आणि त्यानंतर दीड तासाने उल्हासनगर, अंबरनाथ येथील गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. बंब व पाण्याच्या टँकरमधील पाणी संपल्याने काही वेळ अडचण झाली होती. शहरात पाणीपुरवठा करणाºया टँकरमधून पाणी बंबांमध्ये सोडण्यात आले. अग्निशमन दलाचे अधिकारी सुधाकर कुलकर्णी, दत्तात्रेय शेळके, सुरेश शिंदे, तुकाराम पाटील यांच्यासह २५ कर्मचाºयांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस दुपारी ४.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन असल्याने अग्निशमन दलाची तारांबळ उडाली.
बघ्यांच्या गर्दीमुळे पोलिसांचे नाकीनऊ
रेल्वेस्थानकालगतच ही घटना घडल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. उर्सेकरवाडी, डॉ. राथ रोड, स्वामी विवेकानंद रोड, पाटकर मार्ग आणि रेल्वेच्या एलिव्हेटेड पुलावरील गर्दीमुळे मदतकार्यात अडचणी आल्या. सेल्फी तसेच मोबाइलमध्ये चित्रीकरण करणाºयांना पांगवताना सुरक्षा यंत्रणेच्या नाकीनऊ आले.
डोंबिवली स्थानक प्रबंधक ओमप्रकाश करोटिया यांनी रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने एलिव्हेटेड पुलावर तीन तासांसाठी प्रवेशबंदी केली. त्यामुळे अग्निशमन दलाला गोदामात थेट पाण्याचा मारा करण्यासाठी जागा मिळाली. आग अंतर्गत धुमसत राहिल्याने रामनगर भागात प्रचंड धूर झाला. पावसामुळे तो शहरात सर्वत्र पसरला. त्याच्या दर्पामुळे घुसमट झाली. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला.