रुग्णालयाबाहेर अश्रू अन् हुंदक्यांचा फुटला बांध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:17+5:302021-04-27T04:41:17+5:30
ठाणे : रात्रीपर्यंत वडील माझ्याशी बोलत होते, त्यांची ऑक्सिजन लेव्हल मागील तीन दिवसांपासून ९७ होती, माझ्या नातेवाईकांची ...
ठाणे : रात्रीपर्यंत वडील माझ्याशी बोलत होते, त्यांची ऑक्सिजन लेव्हल मागील तीन दिवसांपासून ९७ होती, माझ्या नातेवाईकांची पाठ दुखत होती, ते व्हिडिओ कॉलवर रात्री आमच्या सर्वांशी चांगले बोलले.. आणि सकाळी रुग्णालयातून फोन आला की तुमचे वडील दगावले, तुमचे नातेवाईक गेले.. त्यामुळे सकाळपासूनच वर्तकनाक्यावरील वेदांत हॉस्पिटलबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते. कोणी रडत होते, कोणी मृतांच्या आठवणींनी हंबरडा फोडत होते, तर कुणी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त करीत होते.
वर्तकनगर नाक्यावर वेदांत रुग्णालय आहे. या ठिकाणी सकाळीच रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी झाली. त्यात सोशल मीडियावर ऑक्सिजनच्या अभावामुळे ६ जणांचा मृत्यू, असा मेसेज व्हायरल झाल्याने रुग्णालयाच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त होता. रुग्णालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कोणी आपले वडील गेले, तर कोणी आपली आई गेली म्हणून जोरजोरात हंबरडा फोडत होते. रुग्णालयाच्या चुकीमुळेच माझा भाऊ गेला, त्याची काहीच चूक नव्हती. मुलुंडला आम्हाला बेड मिळाला नाही, म्हणून भावाला शनिवारी रात्री या रुग्णालयात ॲडमिट केले होते. रात्री देखील त्याचे आमच्याशी बोलणे झाले होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हलदेखील उत्तम होती. परंतु, सकाळी फोन आला, तुमचा भाऊ गेला. पायाखालची वाळूच सरकली. त्यातही रुग्णाला ॲडमिट करताना आम्ही रीतसर आधीच त्यांच्या मागणीनुसार ५० हजार रुपये भरले होते. त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच होती. अशातच रुग्णालयाकडून अशी माहिती आल्यानंतर आणखीनच शॉक बसल्याचे रुग्णाचे नातेवाईक सतीश पाटील हे सांगत होते. सतीश यांची पत्नी, मृत विजय पाटील यांची पत्नी आणि मुलगा हुंदके देऊन रडत होते. अचानक सांगतात की, तुमच्या रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया करायची आहे आणि अर्ध्या तासाने परत फोन करून सांगतात तुमचा नातेवाईक दगावला आहे, असा आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकाने केला.
माझे वडील चांगले होते, मागील तीन दिवस त्यांची ऑक्सिजन लेव्हल ९७ होती. परंतु, अचानक डॉक्टरांनी सांगितले, तुमचे वडील गेले. त्यामुळे त्या रुग्णाची मुलगी रुग्णालयाच्या खाली अक्षरश: मोठ्याने हुंदके देत रडत होती. एकूणच रुग्णालयाचे वातावरण शोकाकुल झाले होते. कोणी रुग्णालयावर कारवाईची मागणी करीत होते, कोणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते, तर कोणी हे वेदांत नाही तर हे वेदनादायी रुग्णालय असल्याचा आरोप करीत होते.
दुसरीकडे पोलीस गर्दी करू नका, म्हणून सर्वांची समजूत काढताना दिसत होते. परंतु, रुग्णांचे नातेवाईक पोलिसांनादेखील आमच्या मागचा गेलेला जीव तुम्ही भरून देणार आहात का?, आमच्या नातेवाईकाच्या मृत्यूची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? असे सवाल करून पोलिसांवरदेखील आगपाखड करीत होते. त्यातही याठिकाणी आलेल्या राज्याच्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनादेखील रुग्णांच्या नातेवाईकांनी घेराव घालून आम्हाला न्याय द्या, रुग्णालय प्रशासनाकडून चूक झालेली आहे, आमच्या नातेवाईकांचा मृत्यू रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे, ऑक्सिजनअभावीच मृत्यू झाला आहे, त्यामुळे कारवाई करावी, अशी मागणी हुंदके देऊन करीत होते. कोणाचे अश्रू अनावरण झाले होते, तर कोणी आता आमचे कसे होणार, तर कोणी घरचा कर्ता माणूस गेल्याने अश्रू ढाळताना दिसत होते.